युनायटेड अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा
कोल्हापूर, बेळगाव, निपाणीचे आव्हान संपुष्टात
गडहिंग्लज (प्रतिनिधी): युनायटेड चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आज मंगळूर येनिपोया विद्यापीठ, मुंबईचा महाराष्ट्र पोलीस आणि स्थानिक काळभैरी रोड फुटबॉल क्लब( केबीआर) व यजमान गडहिंग्लज युनायटेडने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. कोल्हापुरच्या प्रँक्ट्रीस क्लब, सम्राटनगर आणि बेळगावचे दर्शन युनायटेड, निपाणी फुटबॉल क्लब यांचे आव्हान संपुष्ठात आले. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर या स्पर्धा सुरु आहेत.
सकाळच्या सत्रातील पहिल्या सामन्यात मंगळूरने प्रँक्ट्रीस क्लबचा चार गोलनी दणदणीत पराभव केला. मंगळूरच्या मानसने आठव्या आणि २१ व्या मिनिटाला मैदानी उत्कृष्ट गोल करून संघाला आघाडीवर नेले. मध्यंतरास तीन मिनिटे शिल्लक असताना के. माधवने गोल करून आघाडी ३-० अशी भक्कम केली. उत्तरार्धातही प्रँक्ट्रीसने धसमुसळा खेळ केल्याने मंगळूरच्या आक्रमक खेळाला मर्यादा पडल्या. मोहम्मदने चौथा गोल करून प्रँक्ट्रिसच्या मोठा पराजय निश्चित केला. मुंबई महाराष्ट्र पोलीसने नवोदित निपाणीचा ४-० असा फडशा पाडला. पूर्वार्धात पोलीसच्या सुयश हंडेने दोन, हिमकत आणि रोहित पवारने प्रत्येकी एक गोल नोंदविला.
दुपारच्या सत्रातील सामन्यात केबीआरने सम्राटनगरला सडनडेथवर ५-४ असे नमविले. निर्धारित वेळेत (१-१) बरोबरच टायब्रेकरमध्येही (२-२) असा सामना बरोबरीत सुटला. टायब्रेकमध्ये केबीआरने बाजी मारली. केबीआरतर्फे महेश जगताप, मदन पावले, फ्रँकी डेव्हिड, सचिन बारामती, विकास जाधव यांनी तर सम्राटनगरच्या शुभम दरवन, नितिन पवार, हर्ष पाटील, वैभव गायकवाड यांनी गोल केले. केबीआरचा गोलरक्षक राजशिवा कलकुटगी, सम्राटनगचा यश यल्लोरे यांनी पेनल्टीचे अनुक्रमे ४ आणि तीन पेनल्टीचे फटके अडवून चमक दाखवली. शेवटच्या सामन्यात यजमान गडहिंग्लज युनायटेडच्या प्रथमेश धबालेच्या उत्तरार्धातील निर्णायक गोलच्या जोरावर बेळगावच्या दर्शन युनायटेडला हरवून आगेकूच केली.
दोन रेड कार्ड
प्रँक्ट्रीस क्लबच्या प्रकाश संकपाळ याने पुवार्धात तर उत्तरार्धात राहूल पाटील यांनी धोकादायक खेळ केल्याने मुख्य पंच संदिप पोवार यांनी मैदानातून बाहेर काढले. परिणामी, खेळाडूंना जायबंदी कऱणा-या प्रँक्ट्रीसच्या खेळाची उपस्थितांत नाराजीचा सूर होता.
उद्याचे सामने
मंगळूर वि. एफसी गोवा अँकाडमी
स. ७.३० वा.
मुंबई वि. सेसा अँकाडमी गोवा
स. ९. ३० वा.
केबीआर वि. मुंबई बदोडा बँक
दु. १.३० वा.
युनायटेड वि. एजीएस केरला
दु. ३.३० वा.

