रौप्यमहोत्सवी वर्ष ; स्पर्धेचे नवे स्वरुप
बेळगाव, कोल्हापूर येथील संघांना निमंत्रित
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : य़ेथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे शनिवारपासून (ता. ३०) माजी खेळाडू डॉ एस. एस. घाळी यांच्या स्मरणार्थ शालेय फुटबॉल स्पर्धा होणार आहे. यंदापासून रौप्यमहोत्सवी वर्षा निमित्य स्पर्धेचे स्वरूप बदलले आहे. स्थानिकसह लगतच्या कोल्हापूर, बेळगाव येथील संघाना निंमत्रित केले आहे. दर शनिवार आणि रविवारी दुपारच्या सत्रात एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर हे सामने होतील. पहिल्या ठप्यात सतरा आणि त्यानंतर चौदा वर्षाखालील स्पर्धा आहेत.
युनायटेडने सन १९९७ मध्ये शालेय फुटबॉलपटूंना अधिक सामने खेळण्यासाठी मिळावेत यासाठी माजी खेळाडू डॉ घाळी यांच्या स्मरनार्थ या स्पर्धेची सुरवात केली. माजी आमदार डॉ घाळी यांचे स्थानिक फुटबॉलला मोठे पाठबळ होते. त्यांच्या योगदानाची नव्या पिढीला ओळख व्हावी हा स्पर्धेचा उद्देश आहे. कोरोनाच्या काळात दोन वर्षे या स्पर्धा खंडीत झाल्या. सहभागी संघाची दोन गटात विभागणी असुन प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. बाद फेरीसाठी रौप्यमहोत्सवाच्या निमित्याने स्पर्धेत बेळगाव, कोल्हापूर येथील नामंवत संघाना निंमत्रित केले आहे. खेळण्याची संधी येथील शालेय संघाना मिळत आहे. त्यातून स्थानिक खेळाडूंना आपली क्षमता तपासून सुधारणा करायला वाव मिळावा अशी संकल्पना आहे.
सतरा गटाची स्पर्धा ‘११ ए साईड’ तर चौदाची ‘नाईन साईड’ पध्दतीने होईल. पहिल्या टप्पात सतरा वर्षे गटाच्या त्यानंतर चौदाच्या स्पर्धा आहेत. शालेय विद्यार्थ्यांची शारिरिक क्षमता लक्षात घेऊन मैदानाचा आकार लहान केला आहे. स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या संघाना प्रतिष्ठेच्या डॉ घाळी करंडकासह क्रिडा साहित्य दिले जाणार आहे. शनिवारी दुपारी १ वाजता स्पर्धेचे उदघाटन होणार असल्याचे युनायटेडचे अध्य़क्ष डॉ रविंद्र हत्तरकी आणि उपाध्यक्ष सुरेश कोळकी यांनी माहीती दिली. समन्वयक अवधूत चव्हाण, सक्षम तोंदले आणि सहकारी स्पर्धेची तयारी करीत आहेत.

