ठाकरे शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
![]() |
| गडहिंग्लज : मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना निवेदन देताना ठाकरे शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी. यावेळी उपस्थित इतर पदाधिकारी. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरातील विविध समस्यांची सोडवणूक तातडीने करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
गडहिंग्लज शहर हे कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण असल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील नागरिकांची मोठी वर्दळ असते. शहराची दिवसेंदिवस हद्दवाढ देखील होत आहे. मात्र शहरात उद्भवलेले अनेक प्रश्न सोडवण्याची गरज आहे. शहरातून संकेश्वर- बांदा हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे, मात्र या मार्गावरील पथदिवे प्रकाशमान करण्याच्या कारणावरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व नगरपालिका यांच्यात वाद निर्माण झाला आहे. याचा फटका शहरातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना बसत आहे. सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांनी आंदोलनाद्वारे आवाज उठवून देखील अद्याप हा प्रश्न कायमस्वरूपी सुटलेला नाही. यावर योग्य तो तोडगा काढण्याची गरज आहे.
तसेच शहरातील विविध गल्लीबोळात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. त्याचबरोबर शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर दुकान गाळे उभे केले आहेत, त्याची चौकशी करावी. अहिल्याबाई होळकर चौक ते नेहरू चौक, वीरशैव बँक, बसस्थानक परिसर या ठिकाणी निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याची नितांत गरज आहे. शहरातील या समस्या सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनातून केली आहे. यावेळी उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, लक्ष्मण पाच्छापुरे, बाळू पाटील, यशवंत पाटील, मुबारक मुल्ला उपस्थित होते.

