शांत स्वभावी, संयमी व्यक्तिमत्व हरपल्याने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथील जनता दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, श्री महालक्ष्मी पतसंस्थेचे माजी चेअरमन, आझाद दूध संस्थेचे संचालक व गडहिंग्लज आगारातील सेवानिवृत्त एसटी कामगार बिकनसो मोदीनसो बजरू (वय ७३) यांचे आज पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने तेरणीतील एक शांत स्वभावी, संयमी व्यक्तिमत्व हरपल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व सुना असा परिवार आहे.
बिकनसो बजरू व त्यांच्या पत्नी शुक्रवारी बेंगळूर येथे नोकरीनिमित्त स्थायिक असणाऱ्या आपल्या धाकट्या मुलाकडे गेले होते. दरम्यान, काल रात्री तेथून आराम बसने परत गावाकडे येत असताना रात्री अकराच्या दरम्यान बसमध्येच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. बसमधील कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी तिकिटावरील मोबाईल नंबरच्या आधारे त्यांच्या चिरंजीवांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
बिकनसो बजरू हे जनता दलाचे कट्टर कार्यकर्ते होते. जनता दलाचे नेते व माजी आमदार स्वर्गीय ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज तालुक्यात झालेल्या विविध आंदोलनात, पक्षाच्या कामात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. जनता दलाचे एकनिष्ठ व स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. गडहिंग्लज आगारात त्यांनी वाहक म्हणून देखील उत्कृष्ट सेवा बजावली होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेतीकामाकडे लक्ष दिले होते. गावातील श्री महालक्ष्मी पतसंस्था व आझाद दूध संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या या अचानक जाण्याने समाजातील एक चांगले व्यक्तिमत्व हरपल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यांच्यावर तेरणी येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

