आजऱ्यातील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या वतीने आयोजन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील महात्मा गांधी सार्वजनिक मोफत वाचनालयाला श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा या संस्थेमार्फत माधवरावजी देशपांडे उत्कृष्ट ग्रंथालय ब वर्ग हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, पुस्तक व रोख रक्कम व गुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
आजरा येथे मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वामन सावंत होते. साहित्यिक कृष्णकांत खोत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी कार्यवाह पुंडलिक नवलकर, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, निखिल कळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा पुरस्कार वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश पाटील, सचिव आप्पासो जाधव,कार्यवाह बी. जी. स्वामी, संचालक ईश्वर हुल्लोळी, सागर आरबोळे, ग्रंथपाल के. डी. धनवडे, श्रीपाद स्वामी, जोतिबा धनवडे यांच्यासह संचालक यांनी स्वीकारला. या संस्थेला आज अखेर चार पुरस्कार मिळाले असून ग्रंथालय कार्यकर्ता व ग्रंथपाल पुरस्कार मिळाला आहे.


