Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

किल्ले सामानगडावर चुकीचं बांधकाम करू देणार नाही!

मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांचा इशारा 


ठेकेदार, चिंचेवाडी ग्रामपंचायत, शिवभक्तांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्याची मागणी


प्रांताधिकारी कार्यालयाला निवेदन देत वेधले लक्ष 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): किल्ले सामानगडावर पर्यटन वाढीच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या बांधकामाबाबत शिवभक्तातून नाराजी आहे. त्यामुळे या संदर्भात तातडीने बैठक बोलाविण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष  नागेश चौगुले यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.



या निवेदनात म्हटले आहे की, किल्ले सामानगड लाखो शिवभक्तांचे ऊर्जा स्थान आहे. यासह कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडहिंग्लज तालुक्याचे वैभव आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्यावर सध्या पर्यटन वाढीच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने बांधकाम सुरु आहे. ही बाब गडावरील पर्यटक आणि शिवभक्तांच्या नजरेत आल्यानंतर नाराजी व्यक्ती केली आहे. गडाचे संवर्धन होणे आणि पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. 



या गडावर सध्या पर्यटन वाढीच्या नावाखाली सुरु असलेले चुकीचे बांधकाम हे नक्कीच शिवभक्तांचे मन दुखावणारे आहे. सध्या गडावर पर्यटन वाढीसाठी पर्यटन विकास महामंडळाकडून दीड कोटीचे काम सुरु आहे. यामध्ये काही अनियमितता आढळल्याने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ल्याचे विद्रूपीकरण  होण्याची भीती शिवभक्तांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार, ग्रामपंचायत चिंचेवाडी आणि शिवभक्तांच्या उपस्थितीत तातडीने बैठक बोलावण्याची मागणी या निवेदनातून केले आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने या निवेदनातून दिला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष  नागेश चौगुले, मनविसे जिल्हाध्यक्ष प्रभात सावळे, शहराध्यक्ष केप्पांना कोरी यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.