Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कृषीपंप ग्राहकांना सोलार सक्तीची अट रद्द करा !

गडहिंग्लजला जय जवान जय किसान फौंडेशनची मागणी 


महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन


गडहिंग्लज : महावितरण कार्यालयाला निवेदन देताना जय जवान जय किसान फौंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व माजी सैनिक.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): कृषी पंप ग्राहकांसाठीची सोलार सक्तीची अट शासनाने रद्द करावी अशी मागणी आजी-माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फौंडेशनच्या वतीने महावितरणच्या गडहिंग्लज विभागीय कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोलार सक्तीमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधण्यात आले. 



निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी सोलार सक्तीची शासनाची अट अत्यंत त्रासदायक आहे. महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य आहे. राज्यात सर्वाधिक प्रमाणात शेती केली जाते. शासनाच्या धोरणानुसार कृषी पंपासाठी सोलार सक्तीची अट घातली असून ऑक्टोबर २०२४ पासून महावितरण कंपनीने कृषी पंपाला फिडरद्वारे सर्व्हिस वीज कनेक्शन देण्याचे बंद केले आहे. या उलट सोलार कनेक्शनची सक्ती केली जात आहे. सोलार कनेक्शन साठीच्या युनिटसाठी दहा टक्के रक्कम ग्राहकाने भरून उर्वरित ९० टक्के शासन भरणार आहे. यासाठी सोलार पॅनेल, मोटार देणार आहे. पॅनेल बसवण्याची जागा शेतकरी ग्राहकाला उपलब्ध करून देण्याची अट घातली आहे. भौगोलिक परिस्थितीचा विचार करता नदीकाठच्या शेतकऱ्यांना सोलार कनेक्शन बसविणे शक्यच नाही. दरवर्षी येणाऱ्या महापुरामुळे सोलार कनेक्शनची मोठ्या प्रमाणात नादुरूस्ती होऊ शकते. याचा फटका शेतकऱ्याला बसणार आहे. या कारणास्तव अशा शेतकऱ्यांना व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी फिडरद्वारे वीज कनेक्शन देणे शेतकरी व शासनालाही सोयीस्कर ठरेल.



नदीकाठावरील सोलार पॅनेलचे नुकसान झाल्यास त्याची दुरूस्ती व देखभाल महावितरण करणार की शेतकऱ्याच्या अंगलट येणार की ती शासनाची जबाबदारी असणार? याबाबत स्पष्टीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी सोलार सक्तीची अट रद्द करून स्थळपाहणी करून फिडरद्वारे सर्व्हिस वीज कनेक्शन देण्याची तरतूद करावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे. यावेळी संघटनेचे सचिव रामकृष्ण शेंडे, संजय जाधव, बसाप्पा आरबोळे, बाळू पोवार, धनाजी चव्हाण, जयवंत नगरे, संभाजी कुरळे, मारुती नावलगी, परशुराम पाटील, सदाशिव खणदाळे यांच्यासह माजी सैनिक व शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.