गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील हिरलगे येथे अवैद्य गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने कारवाई करत एकूण ७ लाख ७२ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाहन चालक शैलेश विलास तरी (रा. जुना बाजार सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आजरा-गडहिंग्लज मार्गावर ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैद्य दारू वाहतुकीची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर या मार्गावरील हिरलगे फाट्यावर अवैद्य गोवा बनावटीची विदेशी मद्याची विनापरवाना तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली व शासनाचा कर बुडवून बेकायदेशीर वाहतूक करीत असताना महिंद्रा कंपनीचे स्कॉर्पिओ वाहन तसेच वाहनातील गोवा बनावटीचे विदेशी मद्य असे मिळून एकूण ७ लाख ७२ हजार ४०० रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल पथकाकडून जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, संदीप जाधव, देवेंद्र पाटील, आदर्श धुमाळ, आशिष पोवार, सुशांत पाटील, श्रीमती ज्योती हिरे यांच्या पथकाने केला.

