मुगळी येथील सोमलिंग मंदिरात कार्यक्रम संपन्न
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आपल्याला मुले किती आहेत हे महत्त्वाचे नाही तर ती मुले किती संस्कारित आहेत ते महत्त्वाचे आहे. असे मत येडुर पाटशाळेचे श्रीशैल गुरुजी यांनी व्यक्त केले.
मुगळी (तालुका गडहिंग्लज) येथील सोमलिंग मंदिरात शांकंबरी पौर्णिमेनिमित्त संस्कार या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नुल मठाचे श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी होते. यावेळी बोलताना श्रीशैल गुरुजी पुढे म्हणाले, संस्कार हे पैशाने मिळत नाही तर ते घरातील आजोबा-आजी व आई वडील यांच्या पासून मिळते. तसेच आईच्या पोटातील मुलाला आठव्या महिन्यापासूनच संस्कार सुरू होते ते संस्कार आजच्या पिढीला टिकून ठेवणे महत्त्वाचे आहे. आपल्या घरात आलेल्या व्यक्तींचे आदर करणे हे एक संस्कार आहे असे सांगून अनेक उदाहरणातून त्यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सानेगुरुजी नगरातील ग्रामस्थांच्या हस्ते स्वामीजींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे व महाप्रसादाचे नियोजन सानेगुरुजी नगरातील ग्रामस्थांनी केले होते. यावेळी श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांचेही आशीर्वाचन झाले. दरम्यान, दत्त भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. साने गुरुजी नगरातील अन्नदात्यांचा स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सोमलिंग मंदिर परिसरात स्वच्छता गृहासाठी ग्रामपंचायत मुगळी यांनी ५३ हजार रुपये निधी मंजूर केल्या याबद्दल सोमलिंग मंदिर कमिटी मार्फत विशेष आभार मानण्यात आले. स्वागत आप्पासाहेब जाधव यांनी केले. आभार दुंडापा पाटील यांनी मानले.





