Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अंगाला हळद लागण्यापूर्वीच नियतीने वराला हिरावले

भडगाव येथील तरुणाचा विहिरीत पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू 


लग्नाच्या आदल्या दिवशीच घटना घडल्याने बंदी कुटुंबावर शोककळा





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : एकाच दिवसावर  येऊन ठेपलेल्या लग्नामुळे  घरात लग्नाची तयारी जोरात सुरू होती. घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. घरातील आनंदावर नियतीची वक्रदृष्टी पडली आणि कोणी कल्पनाही करू शकणार नाही अशी घटना लग्नाच्या आदल्या दिवशी घडली. गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथे सचिन शट्याप्पा बंदी (वय ३२ ) या तरुणाचा विवाहाच्या पूर्वसंध्येलाच विहिरीत पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने बंदी कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.



याबाबतची अधिक माहिती अशी की, भडगाव येथील सचिन या तरुणाचे इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. काही वर्षांपूर्वीच वडिलांचे निधन झाले आहे. सचिन हा गावातील एका काजू फॅक्टरीत कामाला जात होता मात्र त्या ठिकाणी काम कमी झाल्याने सध्या तो मजुरीवर रंगकाम करण्यासाठी जात होता. या माध्यमातून तो आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. दरम्यान, त्याचा विवाह देखील ठरला होता. विवाह  दिनांक २६ जानेवारी रोजी होणार होता. त्यामुळे घरात लग्नाची तयारी देखील सुरू होती. लग्नाच्या निमित्ताने घरी पै पाहुणे देखील आले होते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते.


दरम्यान, सचिन हा लग्नाच्या आदल्या दिवशी दिनांक २५ जानेवारीला दुपारी आपल्या बहिणीला चुलत्यांच्या घरी सोडून तो घरातून बाहेर पडला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परत न आल्याने कुटुंबियांनी व मित्रमंडळीनी सर्वत्र त्याची शोधा शोधा केली. अखेर गडहिंग्लज पोलिसात बेपत्ता झाल्याची वर्दी देण्यात आली होती. दरम्यान दिनांक २८ जानेवारीला भडगाव गावातील विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यामुळे बंदी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. लग्नाच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने नियतीने हळद लागण्यापूर्वीच सचिनला हिरावून घेतल्याने ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होत आहे. सचिन याच्या पश्चात आई, भाऊ  व बहिण असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.