न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेत आगळावेगळा कार्यक्रम
प्रा. शिवाजी पाटील यांनी घडवून आणला आजी- आजोबा व नातवंडे यांच्यात योग्य संवाद
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील कौलगे येथील न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेत आजी-आजोबा स्नेह मेळावा हा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला १३३ आजी-आजोबांचे औक्षण, पुष्पवृष्टी करून व लेझमीच्या तालावर स्वागत करण्यात आले. यावेळी कौलगे, जाधेवाडी, शिंदे वसाहत हिरलगे मधील आजी-आजोबांनी काही प्रसंग व आठवणी सांगितल्या. आजी आजोबा व नातवंडे यांचा योग्य संवाद प्रा. शिवाजीराव पाटील यांनी घडवून आणला. नातवंडे कशाप्रकारे आमच्या जगण्याचा आधार आहेत हे काहींनी सांगितले. संगीताच्या तालावर आजी आजोबांनी नृत्ये केले. आजी आजोबांसाठी काही मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले, विजेत्यांना बक्षीस देण्यात आली. या सर्वांचा आनंद आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता. आजी आजोबांचा नातवांशी होणाऱ्या भावनिक संवादातून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. कार्यक्रमांमध्ये आजोबांना फर टोपी व आजींना फेटा बांधण्यात आला होता. त्यामुळे ते कार्यक्रमाचे केंद्रबिंदू ठरले होते. आजी आजोबांना शाळेकडून भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील पालक व ग्रामस्थ यांनी आर्थिक देणग्या दिल्या. शिवाजी पोवार, काशिनाथ शिंदे, महादेव केसरकर, सुरेश थरकार यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी सरपंच भाऊसो कांबळे, पोलीस पाटील प्रणिता पोवार, तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी पोवार, उद्योजक काशिनाथ शिंदे, सेवा सोसायटीचे चेअरमन महेश शेट्टी, महादेव केसरकर, आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष धनाजी चव्हाण व ग्राममहसूल अधिकारी गजानन पाटील, माजी मुख्याध्यापक सुरेश सरकार उपस्थित होते. प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अरुणकुमार हिरेमठ यांनी तर पाहुण्यांचा परिचय सुनील माने यांनी करून दिला. विश्वजीत चव्हाण यांनी सूत्रसंचालन तर बळीराम पाटील यांनी आभार मानले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी स्वाती पाटील, दीपक सावंत, सुरेखा नंदनवाडे, नामदेव यादव, बाळासाहेब मोहिते, दुडाप्पा कांबळे, गजानन काटकर, परशराम येसरे यांनी परिश्रम घेतले.






