एक अभ्यासू पत्रकार, उपसंपादक व नाट्यकर्मीची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या अकाली एक्झिटने हळहळ व्यक्त
सावंतवाडी : मूळचे सातोसे (ता. सावंतवाडी, सिंधुदुर्ग) गावचे सुपुत्र आणि ‘तरुण भारत संवाद’ च्या सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक, रंगकर्मी प्रवीण सगुण मांजरेकर (४८) यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने पत्रकार बांधवांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे पत्रकारांच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये उपसंपादक प्रवीण मांजरेकर यांचाही सहभाग होता. यावेळी मैदानावर फिल्डींग करत असताना प्रवीण मांजरेकर अचानक खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी तातडीने ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले.
एक अभ्यासू, हुशार पत्रकार व उपसंपादक
प्रवीण मांजरेकर यांनी ‘तरुण भारत’मध्ये सातार्डा वार्ताहर म्हणून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. बांदा प्रतिनिधी म्हणून बरीच वर्षे काम केले. या काळात त्यांनी विपुल लेखन केले. त्यानंतर सावंतवाडी कार्यालयात उपसंपादक म्हणून ते रुजू झाले. त्यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी विविध पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. नुकतीच त्यांची जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव म्हणून निवड झाली होती. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. पत्रकारिता करत असताना नाट्यक्षेत्रात देखील त्यांना आवड होती. त्यामुळे दरवर्षी राज्य नाटय स्पर्धेत ते नाटके सादर करत होते. स्वतःच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी विविध नाटके सादर केली होती. विविध नाटय, एकांकिका स्पर्धांसाठी परीक्षक म्हणूनही ते काम पाहत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

