Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज पोलिसांचा वेगवान तपास ; वृद्ध महिलेच्या खुन्याला चोवीस तासाच्या आत जेरबंद

उसने घेतलेले दहा हजार रुपये मागितल्याने खून केल्याचे निष्पन्न 





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज शहरात शनिवारी शोभा सदाशिव धनवडे या वृद्ध महिलेचा खून करून अज्ञाताने त्यांच्या अंगावरील दागिने पळविले होते. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला होता. या प्रकरणाचा तपास गडहिंग्लज पोलिसांनी गतीने करत अवघ्या चोवीस तासाच्या आत छडा लावला आहे. उसने घेतलेले दहा हजार रुपये मागितल्याने गुरुनाथ उर्फ पिंटू भैरू चौगुले (रा. हट्टी बसवाना मंदिराजवळ, गडहिंग्लज) यानेच खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 



याबाबतची अधिक माहिती अशी की, गडहिंग्लज येथील कचरा डेपो रोडवरील नेहरूनगर येथे राहणाऱ्या शोभा सदाशिव धनवडे या शनिवारी सायंकाळपासून बेपत्ता झाल्या होत्या. एका अज्ञात व्यक्तीने त्यांना मोटरसायकल वरून घेऊन गेल्याचे काहीजणांनी पाहिले होते. दरम्यान शोधाशोध केल्यानंतर मेटाच्या मार्गाजवळील विहिरीतील झाडाझुडपात त्यांचा मृतदेह सापडला होता. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंगावरचे ११ तोळे सोन्याचे दागिने गायब होते. त्यामुळे लुटमारीच्या हेतूने कोणीतरी त्यांचा घात केला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र शोभा यांना गाडीवरून नेणारी नेमकी व्यक्ती कोण? हा प्रश्न सर्वांना पडला होता.दरम्यान, पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत पिंटू चौगुले हाच गाडीवरून घेऊन गेल्याचे समजले. पोलिसांनी गतीने तपास करत त्याला ताब्यात घेतल्यानंतर खरा प्रकार समोर आला. संशयित पिंटू चौगुले हा सदाशिव धनवडे यांच्या घरासमोर किराणा मालाचे दुकान भाड्याने चालवीत होता. परंतु जागा मालकाने नवीन बांधकाम करणार असल्याचे सांगितल्याने त्याचे किराणा दुकान बंद झाले होते. त्यामुळे तो सध्या येथील एका ट्रॅक्टरच्या शोरूम मध्ये वाचमनचे काम करत होता. पिंटू याने घर बांधण्यासाठी व गाडीसाठी १२ हजार रुपये कर्ज काढले होते. हे कर्ज त्याला फेडता येत नव्हते. त्यामुळे त्याने शोभा यांच्याकडे दहा हजार रुपये उसने घेतले होते. ते उसणे दिलेले पैसे शोभा या वारंवार पिंटूकडे मागत होत्या. याच रागातून त्याने घरी चला पैसे देतो असे सांगत शोभा यांना मोटरसायकलवर बसवून आपल्या घरी घेऊन गेला होता. त्या ठिकाणी पाठीमागून दोरीने गळा  आवळून पिंटू याने शोभा यांचा खून केला. त्यानंतर त्यांच्या अंगावरील ११ तोळ्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर त्यांचा मृतदेह मारुती ओमनी या गाडीत ठेवले होते. रविवारी सकाळी हे मृतदेह अशोक आजरी यांच्या शेतातील विहिरीत टाकला होता. याप्रकरणी संशयिताने वापरलेली मोटरसायकल व मारुती ओमनी कार पोलिसांनी जप्त केली आहे. 



सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख  महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या पथकाने मोठ्या वेगाने केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.