ग्रामपंचायतीच्या वतीने प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस ठाण्याला निवेदन

गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी (ता. गडहिंग्लज) येथे अवैधरित्या सुरू असलेली दारू विक्री व मटक्यावर कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
तेरणी या गावी दारूबंदी होऊन देखील गेली चार ते पाच वर्षे झाली अवैधरित्या दारूची विक्री केली जात आहे. तसेच मटका देखील फोफावला आहे. मध्यंतरी काहीवेळा पोलिसांनी धाडी टाकून हे अवैध धंदे बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र थोडे दिवस हे अवैध धंदे बंद असतात आणि पुन्हा सुरू होतात. या अवैध धंद्याच्या आहारी लहान मुले देखील जात असल्यामुळे त्यांचे भविष्य उध्वस्त होत आहे. महिलांमध्ये देखील असुरक्षिततेची भावना आहे. यापूर्वी यासंदर्भात पोलीस प्रशासनाचे ग्रामपंचायतीमार्फत पत्राद्वारे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र अद्याप हे अवैध धंदे सुरूच असल्याने ग्रामस्थांना याचा त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे तातडीने यावर कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून ग्रामपंचायतीने केली आहे.
यावेळी सरपंच रमेश पुजेरी, सदस्य मोसिम मुल्ला, सुरेश कतिगार, किरण चौगुले, विश्वनाथ तराळ, लिंगराज पाटील, एकनाथ कांबळे, रामा कांबळे यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, सदर निवेदन तहसीलदार व पोलीस ठाणे यांना देखील देण्यात आले.

