चंदगड तालुक्यातील अवैध खनिज उत्खननप्रश्नी ठाकरे शिवसेनेचा इशारा
गडहिंग्लजला प्रांताधिकारी यांना दिले निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): चंदगड तालुक्यात अवैध खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याकडे शिवसेनेने लक्ष वेधून देखील प्रशासनाने कडक पावले उचललेली दिसून येत नाहीत. परिणामी येथील निसर्ग संपदेची हानी होत असून शासनाचा देखील लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. यापुढे प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास शिवसेनाच रस्त्यावर उतरून 'त्या' अवैद्य खनिज उत्खनन करणाऱ्यांना धडा शिकवेल असा इशारा शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. सदर निवेदन कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा.सुनिल शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, चंदगड तालुक्यातील अवैध खनिज उत्खननामुळे होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास या संदर्भात सहा महिन्यापूर्वी शिवसेनेने गडहिंग्लज येथे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर राजगोळी बुद्रुक येथे जिल्हा खनिकर्म व महसूल विभाग यांच्या संयुक्त पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक करणारे दहा डंपर जप्त करून कारवाई केली होती. चंदगड तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन होत असल्याचे यावरून सिद्ध झाले होते. तथापि सदर अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर प्रशासनाने कोणत्या प्रकारची कारवाई केली हा मुद्दा मात्र गुलदस्त्यातच आहे. या कारवाईनंतर या चोरीछुपे अवैध गौण खनिज उत्खननाची पूर्णतः पाळेमुळे उखडून टाकण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कडक पावले उचलली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा या खाण माफीयांनी आपले डोकेवर काढल्याचे चित्र चंदगड तालुक्यात आहे.
जंगमहट्टी धरणाकडील दक्षिण परिसर आणि माडवळे, हाजगोळी, म्हाळुंगे, कोलिक, इब्राहिमपूर, चितळे, हिंडगाव या भागात सध्या मोठ्या प्रमाणात बॉक्साइटचे उत्खनन सुरू आहे. या उत्खननामुळे चंदगड तालुक्यातील निसर्ग संपदेवरच घाला घातला जात आहे. हिरवाईने नटलेला चंदगड तालुका खाण माफियांकडून उजाड करण्याचा प्रकार आहे. हजारो झाडांची राजरोसपणे बेकायदेशीर कत्तल केली जात आहे. चोर वाटेने सदर बॉक्साइटची वाहतूक कर्नाटकात केली जात आहे. या उत्खननामुळे येथील शेतीला देखील फटका बसत असून भविष्यात शेतकऱ्यांची शेती देखील धोक्यात येणार आहे. येथील शेतकऱ्यांचे जगण्याचे प्रमुख साधन आंबा व काजू पिकालासुद्धा भविष्यात धोक्याची घंटा निर्माण होऊ शकते. प्रशासनाने केवळ जुजबी कारवाई करून स्वस्त न बसता या अवैद्य गौण खनिज उत्खननावर कडक कारवाई करून कायमस्वरूपी पायबंद घालण्याची गरज आहे. या उत्खननामागे कोण 'गॉडफादर' आहे? याचा शोध प्रशासनाला लावावा लागेल. प्रशासनाला याची पाळेमुळे खोदण्यास का अपयश येत आहे? असा सवाल या निवेदनातून उपस्थित केला आहे. याबाबत प्रशासनाने ठोस कृती न केल्यास शिवसेनाच प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अवैध गौण खनिज उत्खनन करून चंदगडचा निसर्ग संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना व शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्यांना धडा शिकवेल. असा इशारा या निवेदनातून दिला आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख दिलीप माने, युवा सेना जिल्हा अधिकारी अवधूत पाटील, आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, शहर प्रमुख प्रकाश रावळ यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

