रविवारी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान कमिटी तर्फे अखंड हरिनाम सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. हा सोहळा रविवार दिनांक ९ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. यानिमित्त मंदिरात दररोज विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्यामुळे गावातील वातावरण भक्तिमय बनले आहे.
शुक्रवारी ध्वजारोहण, अभिषेक, कलश पूजन, माऊली प्रतिमापूजन, विना पूजन, तुळस पूजन, व्यासपीठ पूजन, ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन, ज्ञानेश्वरी वाचन आदी कार्यक्रम पार पडले. तसेच वेदमूर्ती हनुमंत शास्त्री (हलूरे) कमत्यानहट्टी यांचे कीर्तन व तेरणीतील हर्षदनाथ ओवी आणि महालक्ष्मी भजनी मंडळ कामतवाडी, चाळोबा प्रसादिक भजनी मंडळ वैरागवाडी यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला.
आज शनिवार दिनांक ८ रोजी माऊली हरिपाठ महिला भजनी मंडळ हेब्बाळ जलद्याळ, विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ, तेरणी, हालसिद्धेश्वर भजनी मंडळ ( नामदेव कुरळे, प्रदीप नाईक ) व भोळेवाडी सरिता पाटील व सहकाऱ्यांचा सोंगी भजन कार्यक्रम आयोजित केला आहे.
रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता मिरवणूक व गाव प्रदक्षिणा, दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या विविध कार्यक्रमांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.




