बस स्टँड परिसर, संगमेश्वर चौक परिसरात ग्रामस्थांना गव्याचे दर्शन
ग्रामपंचायतीने खबरदारी घेत ग्रामस्थांना केले सतर्क
संग्रहित छायाचित्र
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी गावातील मध्यवस्तीत आज पहाटे साडेपाचच्या दरम्यान एका गव्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, सावधगिरी म्हणून ग्रामपंचायतीने तातडीने खबरदारीचे आवाहन केले.
आज पहाटे साडेपाचच्या सुमारास गावातील बस स्टँड नजीक बुगडीकट्टी रोडवर असणाऱ्या गॅरेजवळ ग्रामपंचायत कर्मचारी तानाजी सुतार यांना सर्वप्रथम गव्याचे दर्शन झाले. त्यांनी तातडीने याची माहिती दिली. त्यानंतर सहाच्या दरम्यान संगमेश्वर चौकानजीक डेअरीला दूध घालण्यासाठी जाणाऱ्या काही ग्रामस्थांच्या दृष्टीस हा गवा पडला. मध्यवस्तीत हा गवा आल्याने पहाटेपासून गावात कुत्र्यांचे मोठ्या प्रमाणात भुंकणे सुरू होते. मात्र कुत्रे नेमके कशामुळे भुंकत आहेत याचा उलगडा गव्याचे दर्शन झाल्यानंतर ग्रामस्थांना झाले. रात्रीच्या अंधारात आलेला हा गवा उजेड झाल्यानंतर ग्रामस्थांच्या दृष्टीस पडला.
गेल्या दोन महिन्यापासून तेरणी - मनवाड रोडवरील शेतवाडीत गव्यांचा वावर सुरू आहे. या गव्यांमुळे शेतीचे नुकसान देखील होत आहे. दरम्यान, याच कळपातील एखादा गवा मनवाड रोडवरून गावात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

