न्यू युवा मंचच्या वतीने पालिकेला निवेदन
कागदी कपांचा साठा जप्त करण्याची केली मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कागदी चहा कपाचा साठा जप्त करुन त्यावर बंदी घालण्याची मागणी गडहिंग्लज येथील न्यू युवामंच यांच्या वतीने पालिकेकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन शहर अध्यक्ष काशिनाथ गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, पूर्वीपासून चहा हे कपबशी, काचेचे ग्लास, वाटी यामध्ये घरात, चहागाडीवर, हॉटेलमध्ये दिला जातो. पण सध्या मोठ्या प्रमाणावर बाजारात कागदी कप उपलब्ध आहेत. त्यामुळे याचा वापर होत आहे. कागदी कप अनेक केमिकलचा वापर करुन बनवले जातात. त्यामुळे यामधून चहा पिणाऱ्यांच्या शरीरावर परिणाम होतो. प्लॅस्टीकचे कण शरीरात जात असल्याने अनेक ठिकाणी कागदी कपाला बंदी घालण्याची मागणी होत आहे. काही ठिकाणी या कागदी कप वापरास बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज शहरात देखील हॉटेल, चहागाडा या ठिकाणी होत असलेला कागदी कपचा वापर थांबवून त्यावर बंदी घालण्यात यावी व तो साठा जप्त करावा अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
या निवेदनावर काशिनाथ गडकरी, बाळू पाटील, किशोर चौगुले, प्रदीप केसरकर, नितीन पाटील यांच्या सह्या आहेत.

