फ्लोरिडाच्या समुद्रात सुखरूपपणे ड्रॅगन कॅप्सूल लँड
फ्लोरिडा : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यांनी अंतराळातून पृथ्वीवर परतले. भारतीय प्रमाण वेळेनूसार आज पहाटे साडेतीन वाजता फ्लोरिडाच्या समुद्रात ड्रॅगन कॅप्सूल लँड झाले. या दोन्हीही अंतराळवीरांच्या स्वागतासाठी नासाची टीम बोटीसह उपस्थित होती. सुनीता विल्यम्स जूनमध्ये आठ दिवसांच्या मिशनसाठी अंतराळात गेल्या होत्या, मात्र विल्यम्स तिथेच अडकल्या होत्या. तब्बल नऊ महिन्यानंतर त्यांना सुखरूपपणे पृथ्वीवर आणण्यात आले.
अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या देखभाल आणि स्वच्छतेमध्ये आपली महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या स्टेशनला सतत देखभालीची आवश्यकता असते. या स्टेशनचे क्षेत्रफळ जवळपास फुटबॉल मैदाना एवढे आहे. सुनीता विल्यम्स यांनी जुन्या उपकरणांमध्येही बदल केले आणि काही प्रयोग देखील केले. सुनीता विलियम्स यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल ६२ तास ९ मिनिटे घालवली अर्थात ९ वेळा स्पेसवॉक केले आहे. सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने ९०० तास संशोधन केले. दरम्यान त्यांनी १५० हून अधिक प्रयोगही केले आहेत.



