Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजऱ्यातील पाणीप्रश्नी ११ मार्चला अन्याय निवारण समिती काढणार सर्व पक्षीय महामोर्चा

आजरावासियांची पाण्यासाठी पायपीट ; महिला वर्गातून संताप 




आजरा : मागील तीन ते साडेतीन वर्षापासून आजरेवासियांची पाण्यासाठी वणवण सुरु आहे. एक दिवस आड पाणी येत होते. आता आठ दिवसातून एकदा पाणी येत असल्यामुळे आजरेवासियांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अन्याय निवारण समितीने वारंवार निवेदने देऊन, आंदोलने करून, नगरपंचायतीकडून लेखी घेऊन सुद्धा आजरा शहर व उपनगराला स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर ११ मार्च रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे. याबाबतचे निवेदन आजरा पोलीस ठाणे, नगरपंचायत, तहसीलदार यांना देण्यात आले आहे. हा मोर्चा छत्रपती संभाजी चौकातून निघणार आहे.




या निवेदनात म्हटले आहे की, कोट्यावधीची नवीन पाण्याची योजना आणलीय खरी पण त्याचे काम करण्याची पद्धत, ठेकेदाराचे दुर्लक्ष, कामात दिरंगाई आणि नियोजनशून्य कामकाजामुळे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामाच्या दर्जाबाबत देखील काही तज्ञ व जाणकार शंका व्यक्त करीत आहेत. त्याचबरोबर काम करीत असताना जुनी पाईप फुटल्यास तातडीने दुरुस्त करून पाणी पुरवठा करणे गरजेचे असतानाही आठ आठ पंधरा दिवस त्या पाईपची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळेही पाण्याचे वेळापत्रक कोलमडत आहे.



दि. १ जानेवारी रोजी नियमीत व सुरळीत पाणी पुरवठा करणेबाबत नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण केले होते. पंधरा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन नगरपंचायत प्रशासनाने दिले होते. त्याअनुषंगाने कोणतीही कार्यवाही न झाल्याने पुन्हा  ३ फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सुद्धा दि. १८ फेब्रुवारी पर्यंत 30अश्वशक्तीची मोटर बसवून पाणी पुरवठा केला जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. तरीसुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि नंतर नगरपंचायत प्रशासनाने नवीन मोटर खरेदी करणे शक्य नसल्याचे अन्याय निवारण समितीला सांगितले. नवीन पाईप लाईन ज्याठिकाणी पूर्ण झाली आहे त्या ठिकाणांना २ मार्चपासून नियमित पाणी पुरवठा करू असे सांगण्यात आले. परंतु आजअखेर पाण्याचे नियोजन कोलमडलेलेच आहे.  यासाठी दर्गा गल्लीतील महिलांनी थेट नगरपंचायत गाठून आपल्या मागण्या आणि व्यथा मांडल्या. महिलांचे रौद्र रूप पाहून अर्ध्यातासातच पाणीपुरवठा करण्यात आला.  जर अर्ध्या तासात पाणी सोडणे शक्य होते तर आठ आठ दिवस पाणी का सोडले जात नाही? आम्ही आल्यानंतर अर्ध्या तासात पाणी सोडणे कसे शक्य झाले? असे प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आले. 



एकंदरीत नगरपंचायत कोणत्याही मागण्यांच्या निवेदनांना केराची टोपली दाखवून वेळकाढुपणा करत तोंडाला पाने पुसत असल्याचा आरोप करीत आपल्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल का करू नये? अशी विचारणा अन्याय निवारण समितीने या निवेदनात केली आहे. 




निवेदनावर अध्यक्ष श्री. बामणे, मुकुंददादा देसाई, सुधीरभाऊ देसाई, विजय थोरवत, गौरव देशपांडे, पांडुरंग सावरतकर, उदय पवार, वाय. बी. चव्हाण, रणजित देसाई, जोतिबा आजगेकर, दिनकर जाधव, रशीद पठाण, अमित सामंत आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.