वनविभाग, सरपंच परिषद आणि प्रजापीता ब्रम्हाकुमारी आजरा यांचा संयुक्त सहभाग
आजरा : कोणी घर देता का घर?, चोचीतील पाण्याच्या थेंबाने जंगल विझवणारी चिमणी, जंगले ही पृथ्वीची फुप्फुसे आहेत, मी आग विझवणार, अशा विविध प्रकारच्या फलकांच्या माध्यमातून, वनविभाग महाराष्ट्र शासन, सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र), प्रजापित्ता ब्रम्हाकुमारी इश्वरीय विश्वविद्यालय आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री यात्रेनिमित्त रामतीर्थ आजरा येथे जंगल संपदा वणव्यापासून वाचविण्यासाठीचा जनजागृती स्टॉल सुरु करण्यात आला. यातून जंगलांचे संवर्धन आणि वणवा यापासून संरक्षण हा मुख्य हेतू घेऊन हा स्टॉल सुरु करण्यात आला.
सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) यांनी वणवा निर्मूलनसाठी गेले दोन वर्षापासूनचा सूरु अस लेल्या मोहीमेमध्ये शाळा, महाविद्यालये यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. जंगलामध्ये जाळरेषा काढणे, कायदयाचे धाक दाखवणारे माहिती फलक लावणे, टेहाळणी टॉवर व फायर वॉचर यांच्या मार्फत लक्ष ठेवणे, सुरक्षा पथक , निसर्गप्रेमी यांच्या मदतीने लागलेली आग ताबडतोब आटोक्यात आणणे, संशयितांना नोटीस देणे, गुरे चारणाऱ्यांची यादी तयार करणे, अशा पद्धतीने काटेकोरपणे काम राबविले जावे यासाठी प्रत्येक परिक्षेत्र विभागामध्ये कार्यशाळा घेणे, ऑडीओ क्लिपच्या माध्यमातून, प्रसार वाहीनी वरून प्रबोधन करणे, तंत्रज्ञानाचा वापर करून होणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवणे, शाळा,महाविद्यालय यांच्यामार्फत वणवा निर्मूलन रॅलीचे नियोजन, वणवा निर्मूलन वन्यजीव संरक्षण शपथ म्हणवून घेणे, अशा विविध उपायांचा बारकाईने वापर. झाल्याने गत सालामध्ये नुकसानीचे क्षेत्र कमी करण्यामध्ये यश आलेले आहे असे सांगण्यात आले.
जंगली प्राण्यांचा अधिवास वणव्यामुळे नष्ट होत आहे. अन्न, पाणी याबरोबर त्यांचे घरही उद्ध्वस्त होत आहे आणि त्यामुळेच वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळले आहेत. 'कुणी घर देता का घर ?'असे म्हणण्याची वेळ वन्य प्राण्यांवर आली आहे.
त्यांच्या येण्याने शेतपिकाचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जंगले टिकवणे ही काळाची गरज बनली आहे. वणवा प्रतिबंधक मोहीम प्रभाविपणे राबवणेसाठी समाजप्रबेधन चळवळ भक्कम करणेचे अवाहन सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जी.एम. पाटील यांनी केले. ते म्हणाले की, आजरा तालुका सह्याद्रीच्या कुशीत वसलेले गाव आहे. तालुक्याला निसर्ग संपत्तीची सधनता लाभली आहे. या जंगलक्षेत्राचे संगोपन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. वणव्यामुळे, आगीमुळे जंगल क्षेत्र नष्ट होत आहेत. त्यामुळे नैसर्गिक साखळी विस्कळीत होऊन जैवविविधता लोप पावत आहे. विविध प्राणी, पक्षी कमी होत आहेत. जवळ जवळ 200 प्रजाती कमी झालेली आहेत. समृद्ध असलेल्या जंगलाचे संगोपन करणे सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येकाने छोटेखानी का असेना प्रयत्न केला पाहिजे. एक झाड एका वेळी हजारो झाडे लावतो जर आपण त्यांचे फक्त संगोपन केले तर जंगलांचे आपोआपच संवर्धन होईल.
या जनजागृती चळवळीच्या रामतीर्थ- आजरा येथे सुरु असलेल्या स्टॉलचे उद्घाटन, आजरा तहसिलचे नायब तहसिलदार म्हाळसाकांत देसाई यांनी केले. यावेळी वन विभागाचे वनपाल शकील मुजावर, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जी.एम. पाटील, प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या मनिषा बहनजी, मंडल अधिकारी श्री. कुरणे, सुंदर जाधव, देवर्डेचे उपसरपंच मारुती बुरुड, देऊळवाडीचे उपसरपंच संजय सावंत, मडिलगेचे सामाजिक कार्यकर्ते अनिकेत कवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. या उपक्रमासाठी वन विभागाचे वनरक्षक तानाजी लटके, प्रियांका पाटील व वनविभागाचे कर्मचारी यांनीही सहभाग घेतला. आजरा विभागचे विनायक भाई, गंगाधर पाकले भाई, मालती बहनजी यांनीही पुढाकार घेऊन जनजागृती करण्याचे भरीव काम केले. विविध भित्तीपत्रिका, फलक आणि व्याख्यानातून लोकांचे त्यांनी लक्ष वेधले.



