हलकर्णी- तेरणी मार्गाच्या बाजूला शेतवडीतील विहिरीत पडले होते साप
सर्पमित्र मेहबूब सनदी, बाळासाहेब सुतार यांच्या प्रयत्नांना यश
गडहिंग्लज (प्रतिनिध): तालुक्यातील तेरणी-हलकर्णी मार्गावरील तेरणीचे शेतकरी गुडूसाहेब पकाली यांच्या शेतवडीत असणाऱ्या विहिरीत पडलेल्या दोन धामण जातीच्या सापांना सर्पमित्रांनी अथक प्रयत्नाने बाहेर काढत जीवदान दिले. याबद्दल सर्पमित्र मेहबूब सनदी, बाळासाहेब सुतार यांचे कौतुक होत आहे.
तेरणी- हलकर्णी मार्गावर गुडूसाहेब पकाली यांच्या विहिरीत दोन धामण जातीचे साप पडले होते. पकाली यांनी या सापांना पाहिल्यानंतर गडहिंग्लज येथील सर्पमित्र मेहबूब सनदी व हलकर्णी येथील सर्पमित्र बाळासाहेब सुतार यांच्याशी संपर्क साधला. या दोघांनाही विहिरीत हे साप फिरताना दिसले. सर्पमित्र सनदी यांनी ट्रेच्या सहाय्याने एक साप अथक प्रयत्न करून बाहेर काढला. मात्र अंधार झाल्याने दुसरा साप बाहेर काढणे शक्य झाले नव्हते. दरम्यान, याबाबत सनदी यांनी हलकर्णीतील सर्पमित्र बाळासाहेब सुतार यांना याची कल्पना दिली होती. त्यानंतर सर्पमित्र बाळासाहेब सुतार यांनी अतोनात प्रयत्न करून त्या सापालाही बाहेर काढले. धामण जातीच्या आठ फूट लांबीच्या या दोन्हीही सापांना सर्पमित्रांनी विहिरीतून बाहेर काढत जीवदान दिले. यावेळी सर्पमित्र श्री सुतार यांनी सापाबद्दल असणारे गैरसम दूर करून जनजागृती केली.


