निडसोशी, नूल, गडहिंग्लज-बेलबाग, यमकनमर्डी, समर्थ नगर भडगाव येथील स्वामीजींची उपस्थिती
गडहिंग्लज (प्रतिनिध): गडहिंग्लज येथील श्रीदेवी महालक्ष्मी मंदिराच्या नूतन सभा मंडपाची पायाभरणी गुरुवार दिनांक २० मार्च रोजी सकाळी दहा वाजता होत आहे.
सकाळी सात वाजता हिरण्यकेशी नदी घाट ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत सुहासिनींची कलश मिरवणूक निघणार आहे. सकाळी दहा वाजता श्री देवीस जलाभिषेक व पायाभरणी समारंभ कार्यक्रम पार पडणार आहे. हा कार्यक्रम निडसोशी येथील दुरदुंडेश्वर शुद्ध संस्थान मठाचे जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी, नूल येथील सुरगीश्वर मठाचे गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, कसबा नूल येथील श्री रामनाथगिरी समाधी मठाचे मताधिपती परमपूज्य भगवानगिरी महाराज, गडहिंग्लज येथील बेलबाग जडियासिद्धेश्वर आश्रमाचे महंत सिद्धेश्वर महास्वामीजी, यमकनमर्डी- हत्तरगी येथील हरीमंदिराचे पीठाधीश डॉ. आनंद उर्फ नरसिंग एकनाथ गोसावी महाराज, समर्थ नगर भडगाव येथील परमपूज्य किसन महाराज यांची उपस्थिती असणार आहे.
पायाभरणी नंतर श्रीदेवी महालक्ष्मीस ओटी भरणे व महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. ज्या भगिनींना देवीस दुरडी-गारवा आणायचे आहे त्यांनी महालक्ष्मी मंदिर येथे आणावे तसेच सर्व भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्रीदेवी महालक्ष्मी मंदिर, सभा मंडप बांधकाम समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.

