Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित जनता दरबारात आपल्या भागातील समस्या मांडण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

दिनांक 22 रोजी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत जनता दरबार




गडहिंग्लज (प्रतिनिधी): पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचा "जनता दरबार" भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, नरिमन पाॅईंट, मुंबई येथे मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी 3 ते 4.30 या वेळेत आयोजित केला आहे.  या जनता दरबारात प्राप्त समस्यांची जागेवर निर्गत करावयाची असून बुथ लेव्हल पर्यंतच्या भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी  आपल्या भागातील जनतेची कामे लेखी निवेदनाच्या दोन प्रती घेऊन मुंबई येथे हजर रहावे व संबंधित मंत्रालयाची कामे करून घ्यावीत अशी सुचना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले आहे. या संदर्भात आमदार रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना याबाबत पत्रातून कळविल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा अभियंता आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी दिली. 



भारतीय जनता पार्टी व इतर दोन घटक पक्षांचे महायुतीचे सरकार राज्यात स्थापन होऊन पाच महिन्यांचा कालावधी झाला आहे. या सरकारचे काम आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविणे व राज्यातील बूथपर्यंतचे सर्व कार्यकर्ते यांची कामे मंत्रालयात लवकरात लवकर व्हावीत या दृष्टीने प्रदेश भाजपाकडून 'मुख्य समन्वयक' यांची नियुक्ती करुन एक व्यवस्था प्रदेश कार्यालयात केलेली आहे. त्याअनुषंगाने राज्यातून येणारे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची कामे मार्गी लावण्याकरिता गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न केले जात आहेत व त्याला यश सुध्दा प्राप्त होत आहे. कामे झाल्याच्या समाधानाने कार्यकर्ते आपली इतर कामे आटोपून ते पुनःश्च आपल्या भागात पक्षाच्या कामाला जात आहेत. तथापि प्रदेश भाजपाकडून दर महिन्याला एक दिवस प्रत्येक मंत्रीमहोदयांचा 'जनता दरबार' आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. 22  रोजी दुपारी 3.00 ते 4.30 या दरम्यान भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे मा. पंकजाताई मुंडे यांची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. या जनता दरबारच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील, त्या भागातील संबंधित मंत्रीमहोदयांच्या विभागांतर्गत येणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता आपल्या भागातील कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाच्या दोन प्रती घेऊन सकाळी 11.00 वाजता प्रदेश कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहावे याकरिता तशा सूचना द्याव्यात. शक्य असल्यास आपल्या कार्यकर्त्यांनी एक आगाऊ निवेदनाची प्रत bjpmaha@gmail.com ईमेल आयडीवर पाठविल्यास त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करणे व ती प्रत त्या विभागाकडे पाठविणे सोयीचे होईल, असे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील विविध समस्या व प्रश्ने लेखी निवेदनाद्वारे सादर कराव्यात असे आवाहन चंद्रकांत सावंत यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.