Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजरा ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस सेवा केंद्र सुरु

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा




आजरा (हसन तकीलदार ): मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय  आजरा येथे मोफत सुरु करण्यात आलेल्या डायलेसिस सेवा केंद्राचे लोकार्पण सोहळा सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे हस्ते पार पाडला.



वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी रुग्णालयाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. तर प्रास्ताविक आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी केले. प्रास्ताविकात ते म्हणाले की, गरीब रुग्णाला डायलेसिस सेंटरचा उपयोग व्हावा यासाठी नाम. आबिटकर यांनी राज्यात 449 आणि जिल्ह्यात प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस सेंटर सुरु केले आहेत. महात्मा जोतिराव फुले योजना खासगी रुग्णालयाबरोबरच ग्रामीण रुग्णालयातही सुरु केली आहे. त्यामुळे याचा फायदा गोरगरीब रुग्णांना होणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य खात्याला शासनाकडून राज्यात 360 रुग्णवाहिका देण्यात आल्या असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी 9 रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. आजरा ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस सेंटरमध्ये 5 अत्याधुनिक बेड व डायलेसिस मशीन्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे गरीब रुग्णांची होणारी परवड थांबणार असून आर्थिक भुर्दंड वाचणार आहे. रोज शहरी भागाकडे करावा लागणारा प्रवास बंद होणार आहे. त्याचप्रमाणे बॉंबे नर्सिंग ऍक्टमध्ये बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला आहे. सर्व प्रकारच्या सेवा ग्रामीण रुग्णालयात देण्याचा व महाराष्ट्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची जी कमतरता आहे ती सर्व पदे भरण्याचा मानस मंत्री श्री. आबिटकर यांचा आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



पालक मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या गोरगरीब रुग्णांना शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्याचे काम होणेसाठी ग्रामीण स्तरावर आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे. डायलेसिस सेंटरमुळे रुग्णांचा आर्थिक भार तर कमी होणार आहेच त्याचप्रमाणे त्यासाठी जो प्रवास करावा लागत होता तो थांबणार आहे. शहरात न जाता तो याच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.



यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संजय ढसाळ, माजी नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, जयवंतराव शिंपी, विलास नाईक, विजय पाटील, सुधीर कुंभार, राजेंद्र सावंत, परशुराम बामणे, विजय थोरवत, गोविंद गुरव, शरीफ खेडेकर, जितेंद्र भोसले, संतोष भाटले, असिफ पटेल, अमानुल्ला आगलावे, सुहास होडगे, संजय पाटील आदिजण उपस्थित होते. आभार डॉ. पाटील यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.