Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जनसुरक्षा विधेयकाविरोधात गडहिंग्लजला डाव्या आघाडीची निदर्शने

विधेयक तातडीने मागे घेण्याची केली मागणी 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): राज्य सरकारने जनतेच्या अभिव्यक्तीचे व अन्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात आणण्यासाठी 'महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक' तयार केल्याचा आरोप डावी आघाडी व पुरोगामी संघटनांनी केला असून या विरोधात गडहिंग्लज येथे उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सदर विधेयक तातडीने मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले. 



निवेदनात म्हटले आहे की, सरकारचे हे विधेयक शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणण्यात आले असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वच प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे. राज्यातील जनतेचे जीवनमरणाचे प्रश्न सरकारच्या धोरणांमुळे गंभीर बनले आहेत. त्यामुळे राज्यातील विविध जनसमूहांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. जनतेचे विविध प्रश्न सोडवून त्यांचे जीवन सुरक्षित करण्याऐवजी लोकशाही आंदोलने सरकारकडून मोडून काढली जात आहेत.





राज्य सरकारने लोकशाही विरोधी असलेले विशेष जनसुरक्षा विधेयक विनावलंब मागे घ्यावे, जाती-धर्मांमध्ये कलह निर्माण करून स्वार्थी राजकारणासाठी राज्याची सामाजिक सलोखा नष्ट करणाऱ्या व्यक्ती व संघटनांवर कारवाई करावी, स्त्रियांवरील अत्याचार, खंडणी, गुंडगिरी करून हत्या करणाऱ्यांवर तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी, इतिहासाची चुकीची मांडणी व छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी व महिलांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी योग्य धोरणे घेवून त्यांना सुरक्षित जीवन बहाल करावे आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत.


यावेळी जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रा. स्वाती कोरी, शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख दिलीप माने, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, महेश कोरी, मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत देसाई, प्रकाश कुंभार, रामचंद्र नाईक, उदय कदम, अजित मगदूम, बसवराज आजरी, तानाजी कुराडे, रावसाहेब पाटील, वसंत नाईक, धोंडीबा कुंभार, सागर पाटील, शिवानंद घस्ती यांच्यासह डावी आघाडी व पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.