Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णीसह इतर ग्रामपंचायतींनी खडी क्रशरसाठी दिलेल्या दाखल्यांची चौकशी करा !

खडी क्रशरविरोधी शेतकरी संघर्ष कृती समिती, मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन 


चौकशीसाठी तातडीने समिती न नेमल्यास जन आंदोलनाचा इशारा 




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तालुक्यातील हलकर्णी, चंदनकुड, इदरगुच्ची, कडलगे, कुंबळहाळ  या ग्रामपंचायतींनी खडी क्रशरसाठी दिलेल्या दाखल्यांची तातडीने चौकशी समिती नेमून चौकशी करावी. संबंधित ग्रामसेवक यांना निलंबित करावे व सरपंच यांना अपात्र करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी खडी क्रशर विरोधी शेतकरी संघर्ष कृती समिती व मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने गडहिंग्लज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.



निवेदनात म्हटले आहे की, हलकर्णी ग्रामपंचायतीने १५ ऑगस्ट २०१४, २६ जानेवारी २०२३, २६ जानेवारी २०२५ रोजीच्या गावसभा ठरावानुसार हलकर्णी परिसरातील सर्व खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करण्याबाबत निर्णय झाला असताना कोणत्या अधिकाराखाली मासिक सभेचे ठराव केले आहेत. गावसभेत ठरले असताना मासिक सभेत खडी क्रशर चालू करण्यासाठी ठराव होतातच कसे? याची सखोल चौकशी समितीमार्फत झाली पाहिजे. हलकर्णी ग्रामपंचायत व इतर ग्रामपंचायतीनी खडी क्रशरसाठी लोकांची मते विचारात न घेता क्रशर मालकांच्या दबावाखाली येऊन केलेल्या मासिक सभेतील सर्व ठराव रद्द करण्यात याव्यात, चंदनकुड, इदरगुच्ची, कडलगे, कुंबळहाळ व हलकर्णी या ग्रामपंचायतींमधील इतर सर्व दाखल्यांची देखील चौकशी करणे गरजेचे असून आवक जावक रजिस्टरांची तपासणी करावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे. याबाबत तातडीने चौकशी समिती न नेमल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.




निवेदनावर मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, सत्यशोधक चळवळीचे प्रमोद पाटील, उत्तम खानापुरे, शेखर देसाई, रामू शेरवी, अण्णाप्पा धनगर, राजू धनगर, शिवानंद घस्ती, कृष्णा कांबळे, सोमनाथ शिंदे आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.