मुक्ती संघर्ष समितीचे अध्यक्ष कॉम्रेड संग्राम सावंत यांची माहिती
हलकर्णीत खडी क्रशर विरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी व चंदनकुड परिसरात असणाऱ्या खडी क्रशरमुळे बाधित शेतकऱ्यांनी 17 एप्रिल पासून क्रशर बंद कृती समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला मुक्ती संघर्ष समितीने पाठिंबा दिला असून हलकर्णी येथे आंदोलनाच्या स्थळी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, दिगंबर विटेकरी व इतर कार्यकर्ते यांनी भेट दिली. क्रशर मालकांना वेगवेगळ्या विभागानी दिलेल्या परवानग्या व ना हरकत दाखले याची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करणार असल्याचे कॉम्रेड संग्राम सावंत यांनी सांगितले.
यावेळी शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली,"खडी क्रशर परिसरातील शेती नापीक झाली आहे. घरांना भेगा पडल्या आहेत. शेतातील धूळमिश्रित चारा खाऊन जनावरे आजारी पडत आहेत. नागरिकांना धुळीमुळे श्वास घेणेही कठीण झाले आहे. या सर्व परिस्थितीची पाहणी तालुकास्तरीय जबाबदार अधिकाऱ्यांनी करून सुद्धा हे प्रशासन आमच्या जीवावर का उठले आहे? आमच्या जीवापेक्षा शासनाला क्रशरचा महसूलच अधिक महत्त्वाचा असेल तर आमची गुरेढोरे शासनाच्या स्वाधीन करावित का?" असे आंदोलक शेतकरी यांचे म्हणणे आहे. कृती समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या हाताची शस्त्रक्रिया झाली. कालपासून ते या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी घरी न जाता रुग्णालयातूनच गेली तीन दिवस आंदोलक व जनावरे उन्हात न्याय मागण्यांसाठी लढा देत आहेत. मात्र या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची दया अद्याप शासनाला आलेली नाही. शासनाला जाग येणार नाही. यासाठी पुढे काय करायचे? काय काय झाले आहे? काय काय केले आहे? याबाबतीतील सर्व माहिती घेणार आता. त्याबाबतची सर्व कागदपत्रे तपासून तसेच हलकर्णी येथील सात खडी क्रशरमुळे नागरी वस्ती तसेच शेतजमीन चारा, गुरे-ढोरे यांचे प्रचंड नुकसान होत आहे, याविरुद्ध बाधित शेतकऱ्यांनी सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. मात्र, या आंदोलनाची शासनाकडून योग्य दखल घेण्यात आली नाही व संबंधित क्रशर अद्याप चालूच आहेत. त्यामुळे हलकर्णी येथे खडीक्रशर विरोधातील आंदोलनात शेतकरी जनावरांसह सहभागी झाले आहेत. हे सर्व समजून घेऊन या आंदोलनाला मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने पाठिंबा जाहीर करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा आणखी तीव्र करण्याचे ठरले. यावेळी कॉ. संग्राम सावंत यांनी कोणकोणत्या बाबीवर आपला लढा सुरु राहिल ते मुद्देही नमूद केलेले आहेत.
यामध्ये त्यांनी महसूलच खात्याचा चुकीचा कारभार जनतेसमोर आणणार, क्रशर मालकांनी घेतलेल्या वेगवेगळ्या परवानग्या व ना हरकत दाखल्यांची पुन्हा तपासणी करण्यासाठी आवाज उठवणार, उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर स्थळपहाणी करायला गेल्यावर बेकायदेशीररित्या खडी क्रेशर घेऊन जाणाऱ्या वाहनांची चाललेली वाहतूक याचा झालेल्या पंचनामाचे पुढे काय झाले अशा अनेक बेकायदेशीर गोष्टी हलकर्णी येथे घडत आहेत. याचाही सवाल जिल्हाधिकाऱ्यांना व विभागीय आयुक्तांना विचारणार, ग्रामसभेचा ठराव मोडून बेकायदेशीररित्या मासिक सभा ठराव करणाऱ्या सर्व संबंधित तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व सरपंच आणि सदस्य यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार, क्रशर बेकायदेशीर नाही असे म्हणणाऱ्या क्रशर मालकांना मुक्ती संघर्ष समिती ते क्रशर बेकायदेशीरच आहेत हे आतापुराव्यानिशी सिद्ध करणार, परवानग्या देणाऱ्या सर्व विभागांची आता कसून चौकशी झाली पाहिजे. यासाठी पुणे विभागीय आयुक्तांकडे मागणी करणार, वेगवेगळ्या विभागांनी दिलेल्या परवानग्या व नाहरकत दाखले यांची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करणार, आम्ही कोणाकोणाला पैसे दिले आहेत असे जाहीर केलेल्या व पैसे देऊन चुकीच्या पद्धतीने क्रशरचा कारभार करणाऱ्या क्रशरमालकांची चौकशी करा अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मागणी करणार, मागील काही वर्षांमध्ये याबाबतची आंदोलने का झाली नाहीत.? असा सवाल करणाऱ्या क्रशर मालकांना आमचे आव्हान आहे की आंदोलन का केले नाही यापेक्षा आपण चुकीचा कारभार इतक्या वर्षे का केला? याचा हिशोब मुक्ती संघर्ष समिती विचारणार आणि घेणार, क्रशर मालकांसोबत कोण कोण होते, याचाही खुलासा यापुढे करणार, असे प्रसिद्धी पत्रक देणाऱ्या क्रशर मालकांना मुक्ती संघर्ष समितीचे आव्हान आहे की नावे ताबडतोब जाहीर करा. कोण कोण तुमच्याबरोबर होते यापेक्षा आपण क्रशर न्यायिक बाजूने व पर्यावरणाला हानी न होता चालवत आहात का? हे महत्त्वाचे आहे, क्रशर मालकांना परवानग्या कशा मिळाल्या याचा फेर तपास करण्यासाठी मागणी करणार तसेच क्रशरमालकांचा मालकी हक्क कसा बदलत गेला आणि याबाबतीतील सर्व कागदपत्रे तपासण्यासाठी मागणी करणार, अशा सर्व मुद्यासाठी आपण या लढ्यात शेतकऱ्यांना पाठिंबा देत उतरणार असल्याचे कॉ. संग्राम सावंत यांनी सांगितले.

