१७ एप्रिलपासून हलकर्णी बस स्टँडवर जनावरांसह आंदोलनाला बसणार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे सुरु असलेल्या खडीक्रशर प्रश्नी विविध आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधून देखील अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने येथील शेतकऱ्यांनी आता दिनांक १७ एप्रिल पासून हलकर्णी बस स्टँड या ठिकाणी न्याय मिळेपर्यंत आपल्या घरातील सर्व जनावरांसह बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात खडी क्रशर बंद कृती समितीच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हलकर्णी येथे सुरू असलेले सर्व खडी क्रशर कायमस्वरूपी बंद व्हावेत यासाठी दि.६ व ७ मार्च रोजी शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह हलकर्णी ग्रामपंचायत व मंडल अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यामुळे दि.७ मार्च रोजी रोजी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी खडीक्रशरमुळे होणाऱ्या नुकसानग्रस्त भागाची स्थळ पाहणी केली होती. त्यानंतर तहसीलदार कृषिकेत शेळके यांनी पुढील आदेशापर्यंत येथील सर्व खडीक्रशर बंदचा लेखी आदेश दिला होता. दरम्यान, दिनांक २० मार्च रोजी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत खडीक्रशर मालक व सर्व आंदोलनकर्ते शेतकरी यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत आंदोलनकर्ते शेतकरी व खडीक्रशर मालक यांच्या समक्ष नुकसानग्रस्त भागाचा पाहणी अहवाल प्रदूषण महामंडळाकडून प्राप्त होईपर्यंत खडीक्रशर बंदचा आदेश कायम केला होता. त्याच अनुषंगाने पुन्हा कोल्हापूर येथील प्रदूषण महामंडळ कार्यालयाला शेतकऱ्यांनी कृती समितीमार्फत दि.२६ मार्च रोजी निवेदन देत लक्ष वेधले होते. मात्र या खडी क्रशरवर अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे दिनांक १७ एप्रिल पासून हलकर्णी बस स्टँड येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी या निवेदनातून दिला आहे.
निवेदनावर राजगोंडा पाटील, उत्तम खानापुरे, मायाप्पा धनगर, राजू धनगर, बाळाप्पा केसरकर, महावीर शिखरी, राजू धनगर, आप्पा तांबडे, हुसेन परीट, अकबर परीट, इब्राहिम परीट, जयपाल शेरवी, आपाण्णा मुन्नोळी, शामराव धनगर, शेट्याप्पा बडक्यागोळ, उमेश धनगर, सुरेश धनगर, अण्णाप्पा धनगर, शेखर देसाई, राजू चाळूगोळ, अण्णाप्पा धनगर, महेश मुंगुरवाडे, बिराप्पा धनगर, आप्पासो पोवार, अशोक धनगर, सुनील लब्यागोळ, केंपान्ना धनगर, बाळाप्पा धनगर आदींच्या सह्या आहेत.

