येणेचवंडी येथील ज्ञानदीप वाचनालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
गडहिंग्लज (प्रतिनिधी): समाजातील विषमतेची दरी आणि त्यातून होणारी मानवतेची हानी स्वतः अनुभवल्यानंतर एका ध्येयाने प्रेरित होऊन केंब्रिज आणि कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना रोज अठरा तासांचा अभ्यास केला. जगातील पुढारलेल्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून संपूर्ण मानवजातीसाठी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार जीवनपद्धतींचा समावेश ज्यांनी भारतीय राज्यघटनेत केला त्या महामानवाचा समतेचा संदेश समाजात रूजला पाहिजे असे विचार साधना विद्यालय गडहिंग्लज येथील शिक्षक सुरेश दास यांनी व्यक्त केले.
येणेचवंडी (ता.गडहिंग्लज) येथील ज्ञानदीप वाचनालय आयोजित डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यामंदिर येणेचवंडीचे मुख्याध्यापक दिलीपकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. नीळकंठ कुराडे यांनी प्रास्ताविक केले, तर वाचनालय अध्यक्ष दशरथ राऊत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रारंभी दास यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. सेवानिवृत मुख्याध्यापक सदाशिव कुराडे व वाचनालयाचे उपाध्यक्ष आनंदा कुराडे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच वाचनालय आयोजित निबंध-स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रे देवून गौरव करण्यात आला
सुरेश दास पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांनी सामाजिक न्याय आणि समतेचा पुरस्कार केला. तोच धागा पकडून बाबासाहेबांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेश आणि महाड येथील चवदार तळ्याचा प्रश्न चळवळीच्या पटलांवर आणला. यावेळी मुख्याध्यापक दिलीपकुमार पाटील, अनिल गोणी यांची भाषणे झाली.
सरपंच दिपाली कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. संजय बिरंजे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विनायक कांबळे, सुनिल कुराडे, दीप्ती पाटील,सुनिता सासूलकर, धोंडीराम माने,विजय इंगळे, प्रशांत भोसले, श्रीकांत मांगले यांच्यासह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.

