Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रतिकूल परिस्थितीशी मात करत गडहिंग्लजचा ओंकार बनला भारतीय सैन्य दलात 'अग्निवीर'

जय जवान जय किसान फौंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन शुभेच्छा





गडहिंग्लज (प्रतिनिधी): डोक्यावर फाटके छत, प्रतिकूल परिस्थिती, दररोज राबल्याशिवाय उदरनिर्वाह करणे कठीण अशा नाजूक परिस्थितीत देखील खचून न जाता, परिस्थितीचा बाऊ न करता स्वकर्तुत्वावर मोठ्या जिद्दीने परिश्रम घेऊन सराव करत पहिल्याच प्रयत्नात गडहिंग्लज येथील ओंकार अशोक नाईक हा भारतीय सैन्य दलात अग्निवीर बनला आहे. वडील अशोक नाईक यांचा संघर्ष व मुलाने मिळवलेले यश खरोखरच युवा पिढीने आदर्श घेण्यासारखे आहे.  सैन्य दलात त्याची निवड झाल्याने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले आहे. दरम्यान, या निवडीबद्दल आजी-माजी सैनिक तालुका वेल्फेअर असोसिएशन संचलित गडहिंग्लज येथील जय जवान जय किसान फौंडेशनच्या वतीने ओंकारला सन्मानचिन्ह देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. 



ओंकार अशोक नाईक हा गडहिंग्लज येथील नाईक गल्लीतील रहिवासी. अशोक नाईक यांना ओंकार, अमृता व अमन अशी तीन मुले. संसाराचे रहाटगाडगे ओढताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अशोक नाईक यांनी आपल्या या तीनही मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. ओंकार हा लहानपणापासून आज्जीकडे कर्नाटकातील गोकाकमध्ये राहिला. त्याचे शिक्षण कन्नडमध्ये झाले. आपल्या वडिलांच्या मेहनतीची जाणिव, त्याची जिद्द, चिकाटी, मेहनत यामुळे त्याने बागलकोट येथे खुल्या सैन्य भरती (अग्नीवीर) मध्ये नशीब आजमावले.  या भरतीत पहिल्याच प्रयत्नात त्याला यश मिळाले. ओंकारने कोणत्याही अकॅडमीत प्रवेश न घेता स्वकर्तृत्वावर सराव करत त्यांने मेहनत घेतली. या जोरावरच या सैन्य भरतीत त्याला यश मिळवता आले.


गडहिंग्लज: ओंकार याच्या घरची परिस्थिती अशी बेताची असून देखील त्याचा बाऊ न करता त्याने भारतीय सैन्य दलात यश मिळवून आपल्या आई-वडिलांचे कष्ट सार्थकी ठरवले आहेत. 


ओंकारचे भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल संपूर्ण कुटुंब आनंदात आहे. ओंकारचे कॉमर्स दुसऱ्या वर्षाचे शिक्षण झाले असून अमृताने १२ वीची तर अमन याने १० वी ची परीक्षा दिली आहे. 


ओंकारच्या या निवडीबद्दल आजी-माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित गडहिंग्लज येथील जय जवान जय किसान फौंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील, सल्लागार शिवाजी भोसले, बसाप्पा आरबोळे, सुभाष गावडे, जयवंत नगरे,  सदस्य धनाजी चव्हाण, शिवशंकर देसाई उपस्थित होते.


  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.