Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राजगोळीतील हेमरस साखर कारखान्यातील नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या!

ठाकरे शिवसेनेच्या वतीने कारखाना प्रशासनाला निवेदन 





चंदगड : साखर कारखान्यातील नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने राजगोळी येथील हेमरस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. 




निवेदनात म्हटले आहे की, मौजे राजगोळी (ता. चंदगड) येथे हेमरस प्रायव्हेट लिमिटेड हा साखर कारखाना गेल्या दहा-बारा वर्षांपासून कार्यान्वित आहे. या कारखान्यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सोय झाल्याने हा कारखाना सर्वांना वरदान ठरला असून कारखाना देखील उत्तम पद्धतीने चालविण्यात येत आहे याबद्दल आमचे दुमत नाही. त्यामुळे कारखाना प्रशासनाचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत.



परंतु, या कारखान्यात नोकर भरती करत असताना स्थानिकांचा विचार केलेला दिसत नाही. या ठिकाणी विविध पदांवर कार्यरत असणारे कर्मचारी हे बाहेरील असल्याचे समजते. कारखान्यात भविष्यात इथेनॉल निर्मिती प्रकल्प देखील कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे नियमित नोकर भरती बरोबरच या ठिकाणी देखील नव्याने कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील  चंदगडसह, आजरा, गडहिंग्लज या भागातील बेरोजगार युवकांना संधी दिल्यास त्यांना रोजगार प्राप्त होईल. त्यामुळे कारखान्याने कार्यस्थळावर एखादा रोजगार मेळावा आयोजित करून कुशल व अकुशल कामगारांची निवड करावी  व त्यांना संधी द्यावी. हा साखर कारखाना पूर्ण क्षमतेने व सुरळीत सुरू असण्यापाठीमागे येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. हजारो सभासदांनी दाखवलेल्या विश्वासावर हा कारखाना सुरू आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मुलांना कारखान्यातील नोकरभरतीत प्राधान्य देणे तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनाने या भागातील स्थानिक बेरोजगार युवकांचा नोकर भरतीत विचार करावा. अन्यथा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली या भागातील सभासद शेतकऱ्यांचे बेरोजगार युवक आंदोलन करतील, त्याचा परिणाम भविष्यात साखर कारखान्याच्या गळीत हंगामावर होऊ शकेल याकडे देखील या निवेदनातून लक्ष वेधले आहे.



निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, तालुका संघटक विक्रम मुतकेकर, गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार, युवा सेनेचे कोल्हापूर जिल्हा अधिकारी अवधूत पाटील, तालुकाप्रमुख किरण नागुर्डेकर आदींसह इतरांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.