राहत खिदमत फाउंडेशन अनेक विधायक कामात अग्रेसर
आजरा (हसन तकीलदार ): येथील राहत खिदमत फाउंडेशन तर्फे मान्यवर तसेच गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. आंबोली रोड आजरा येथील त्यांच्या कार्यालयात हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रेसिडेंट आलमभाई नाईकवाडे, सेवा निवृत्त सैनिक गजबर वंटमुरे आणि शैक्षणिक क्षेत्रात उज्वल यश संपादन करणाऱ्या इक्रा माणगावकर या सर्वांचा हा सत्कार समारंभ होता.
आजऱ्यातील राहत खिदमत फाउंडेशन मार्फत विविध सामाजिक कार्य केले जातात. मोफत आरोग्य तपासणी, मोफत नेत्र तपासणी, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य, गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू वाटप अशी विविध सामाजिक कार्यें करीत सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य राहत खिदमत फाउंडेशन करीत आहे. या अगोदरही या फाउंडेशनने विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम केला आहे.
यावेळी सतत 39 वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले आर्मी ऑफिसर गजबर वंटमूरे यांचा सत्कार मौजुद माणगावकर यांच्या हस्ते तर इक्रा रिजवान माणगावकर या विद्यार्थिनीने रेहमानी ट्रस्ट संभाजीनगर यांचे मार्फत नेट सेटच्या मार्गदर्शन वर्गात प्रवेश मिळवाण्यासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेबद्दल करीमभाई कांडगावकर यांच्या हस्ते व अंजुमन इत्तेहादुल इस्लाम आजरा च्या प्रेसिडेंट पदी आलमभाई नाईकवाडे यांची निवड झालेबद्दल जमीलभाई निशानदार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित अंजुमन कमिटीच्या सदस्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यासिन सैय्यद यांनी केले. यावेळी शफिकभाई तकीलदार, युनूस जंगी, मोहसीन हेरेकर, मजीद मुल्ला, सलीम शेख, रिजवान माणगावकर, मुफ्ती खालिद खलिफ, हाफिज अब्दुलरहिमान कांडगवकर, हाफिज तौफिक काकतिकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बबलू शेख यांनी आभार मानले.




