आजरा आगारप्रमुखांकडे याबाबतची तक्रार करून चौकशीची मागणी करणार
ग्राहक पंचायतीचे विभाग प्रमुख व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजीराव गुरव यांची माहिती
मुंबई : बोरिवली- आजरा या एसटी बसचा शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास सातारा व कराड दरम्यान एका खासगी ट्रॅव्हल्सला धडकून अपघात झाला. या अपघातात बऱ्याच जणांना मुक्का मार तर एका महिलेच्या कपाळाला मोठी जखम देखील झाली. मात्र पहाटेपासून सकाळपर्यंत प्रवाशांवर उपचार अथवा पर्यायी व्यवस्था केली गेली नसल्याने प्रवाशांचे हाल झाले. याबाबत गडहिंग्लज ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्या रोहिणी चौगुले यांनी जाब विचारल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मात्र अपघात घडल्यानंतर प्रवाशांची कोणत्याही प्रकारची काळजी न घेतली गेल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, ग्राहक पंचायतीचे आजरा-गडहिंग्लज विभागप्रमुख व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी याबाबत आजरा आगार प्रमुखांकडे तक्रार करणार असल्याची माहिती दिली आहे.
शनिवार (दिनांक 26) बोरिवली- आजरा या एसटी बसचा पहाटे साडेतीनच्या दरम्यान सातारा - कराडच्यामध्ये अपघात होऊन काही प्रवासी जखमी झाले. बऱ्याच जणांना मुक्कामार लागला. एका महिलेच्या कपाळावर मोठी जखम होऊन रक्त पडू लागले. मात्र जखमी प्रवाशांकडे चौकशी न करता नवीन गाडी किती खराब झाली याकडे चालकाचे लक्ष होते, असा आरोप प्रवाशांनी केला आहे. सर्व प्रवासी झोपेत बेसावध असताना अपघात झाल्याने मुक्का मार लागला. वास्तविक जखमी प्रवाशांना जवळच्या दवाखान्यात घेऊन जाणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नसल्याचे प्रवाशांनी सांगितले. गाडीवर प्रथम सेवेत असणारा चालक गाडी व्यवस्थित चालवत होता. मात्र मध्येच चालक बदलला. सदर चालक गाडी चालवत असताना बस डळमळीत होत असताना एका प्रवाशाने त्यांना सूचना केली. "गाडी डळमळत आहे बाजूला घेऊन थोडी झोप काढा मग पुढे जाऊया" मात्र त्यांनी फक्त तोंडावर पाणी मारून घेतले व पुन्हा गाडी चालवू लागले, वेळ बरी म्हणून मोठा अपघात झाला नाही. असे बसमधील प्रवाशांनी सांगितले. या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील प्रवाशांनी केली आहे.
अपघातानंतर पहाटेपासून सकाळी सहापर्यंत प्रवाशांना पुढे पाठवण्याची पर्यायी व्यवस्था अगर दवाखान्यात नेण्याची तसदी घेतली नाही. आगारातील वरिष्ठांनी देखील या अपघाताबाबत गांभीर्याने घेतली नसल्याची तक्रार प्रवाशांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्याकडे केली आहे. सदर बसमध्ये गडहिंग्लज ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्या रोहिणी चौगुले देखील होत्या. त्यांनी प्रवाशांची पुढे जाण्याची सोय करा अन्यथा तुमच्यावर तक्रार करणार असे सांगताच प्रवाशांना पुढे पाठवण्याचे काम वाहकाने केले. प्रवाशांची काळजी न करणाऱ्या व अपघाताचे गांभीर्य नसणाऱ्या त्या चालकाची चौकशी व्हावी व सदर अहवाल माहिती प्रत ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा आजरा यांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सदरची माहिती ग्राहक पंचायतीचे आजरा -गडहिंग्लज विभाग प्रमुख व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही सुरू केली आहे.

