गडहिंग्लज (प्रतिनिधी): शहरातील जागृती प्रशालेमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचा शाळेचा पहिला दिवस मिरवणूक व पुष्पवृष्टीने अविस्मरणीय करण्यात आला. उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळेचे आवार गजबजले. शाळेच्या आवारात काढलेल्या रांगोळ्या, फुलांनी व फुग्यांनी सजवलेले वर्ग नवागतांनी सकारात्मक, आनंददायी आणि प्रेरणादायी क्षण अनुभवला.
सजविलेल्या ट्रॅक्टरमधून नवागतांची ढोल, ताशा व झांज पथकाच्या आवाजाने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी 'चला शाळेला चला', साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा, मुलांना शाळेत पाठवूया शिक्षणाचा प्रकाश देऊया, जो राहे निरक्षर तो फसे निरंतर आशा घोषवाक्यांनी सारा परिसर दुमदुमून गेला. रस्त्याच्या दुतर्फा पुष्पवृष्टीचा वर्षाव नवागतच्यावर करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण व गोड खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके व गुलाब पुष्प मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, उप मुख्याध्यापक शिवाजी अनावरे, राम मगदूम, सौ कांचनगौरी सुतार, अनिल मसाळे, महंतेश दड्डी यांच्या हस्ते देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मुलांचे चेहरे खुलून गेले होते.
मुख्याध्यापक श्रीरंग तांबे यांनी नवागतांचे स्वागत करताना म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये आपुलकीचा भाव निर्माण व्हावा, शिक्षणाबद्दल कुतूहल व आत्मविश्वासाचे बीज याच मंदिरात रूजावे हा उद्देश असल्याचे सांगून नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
नवागतांच्या स्वागतासाठी क्रीडा शिक्षक संपत सावंत, इराप्पा मरडी, संजय गडकरी, विपुल गावित, अमित हिरेमठ,सौ. गीता पाटील , सौ एस. बी. सुतार, सौ एस. एन. कमनुरी यांनी विशेष परिश्रम घेतले.



