घरात गळफास लावून घेत संपविले जीवन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील लीलावती भिमराव जंगली (वय १५) या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येने सर्वांच्याच मनाला चटका लागला असून ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची वर्दी तीचे वडील भीमराव इराप्पा जंगली यांनी गडहिंग्लज पोलिसात दिली आहे. आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.
याबाबतची अधिक माहिती अशी की, लीलावती ही गडहिंग्लज येथील वि. दि. शिंदे हायस्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती. शाळेला उन्हाळी सुट्टी असल्याने शनिवारी दिवसभर ती आपल्या शेतात आई-वडिलांबरोबर पेरणी कामात मदत करण्यासाठी गेली होती. रात्री सर्वजण जेवण करून मधल्या खोलीत झोपले होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास जाग आल्यानंतर वडील भीमराव हे उठून स्वयंपाक खोलीत गेले असता तेथील लाकडी तुळईला नायलॉनच्या दोरीने लीलावतीने गळफास लावून घेतल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी तातडीने घरातील सर्वांना त्यांनी उठवले. तिला तातडीने मोटरसायकल वरून गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या पश्चात आई वडील, आजी, तीन लहान बहिणी असा परिवार आहे. घरात आपल्या आई-वडिल व लहान बहिणींसोबत नेहमी हसत खेळत राहणाऱ्या लीलावतीने अचानक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

