Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बनावट नोटांप्रकरणी गडहिंग्लज पोलिसांची मोठी कारवाई ; पश्चिम बंगालच्या दोघांना अटक

बनावट नोटांच्या रॅकेटचे मूळ शोधून काढण्यात गडहिंग्लज पोलिसांना यश 


आतापर्यंत एकूण १० संशयित गजाआड ; २२ लाखांच्या बनावट नोटा दिल्याचे निष्पन्न 


जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांच्याकडून गडहिंग्लज पोलिसांचे कौतुक





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लजमध्ये सापडलेल्या बनावट नोटांचे कनेक्शन महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिसा ते थेट पश्चिम बंगालपर्यंत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून गडहिंग्लज पोलिसांना बनावट नोटांचे संपूर्ण रॅकेटच शोधून काढण्यात यश आले आहे. याप्रकरणी पश्चिम बंगाल येथील मलिक अफसर अली शेख, टोनी जहरुद्दीन शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १० संशयितांना पोलिसांनी गजाआड केले आहे. २२ लाखांच्या बनावट नोटा दिल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. 


याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की,  गडहिंग्लजमध्ये १७ जून रोजी संशयित आकाश रविंद्र रिंगणे (रा. खोत गल्ली, नदीवेस, गडहिग्लज) याने येथील एका बँकेच्या एटीएममध्ये त्याच्या खात्यावर पाचशेच्या ३५ नोटा असे १७ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा डिपॉझीट करुन बँकेची फसवणुक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. या तपासामध्ये नितीन भैरु कुंभार (वय ३३ रा. कुंभार गल्ली नदीवेस गडहिंग्लज), अशोक महादेव कुंभार (वय ५४ रा. प्रभूवाडी गल्ली चिक्कोडी ता. चिक्कोडी, जि. बेळगावी )यांची नावे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. यातील मुख्य संशयित अशोक कुंभार हा यापूर्वी बनावट नोटाप्रकरणात बेंगलोर येथील तुरुंगात शिक्षा भोगत असताना या ठिकाणी  त्याची ओळख पश्चिम बंगालच्या जहीरुद्दीन शेख व ओडिसाच्या तपसकुमार प्रधान यांच्याशी झाली होती. तुरुंगातून मुक्तता झाल्यानंतर त्याने बनावट नोटा संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधुन पुन्हा यामध्ये सक्रिय झाला होता. पश्चिम बंगाल येथील टोनी जहीरुद्दीन शेख याच्याकडुन २२ लाखपर्यंतच्या बनावट नोटा त्याने घेतल्या होत्या. 


त्या बनावट नोटा यातील संशयित दिलीप सिध्दाप्पा पाटील (वय ४३ रा. बिद्रेवाडी ता. हुक्केरी जि. बेळगावी),  सतिश बसप्पा कंकनवाडे वय ४५ रा. याडगुळ ता. हुक्केरी जि. बेळगाव),  भरमु पुंडलिक कुंभार (वय ३८ रा. बसवनाळगड्डे ता. चिक्कोडी जि. बेळगाव),  अक्षय अशोक कुंभार वय ३४ रा. प्रभुवाडी चिक्कोडी ता. चिक्कोडी जि. बेळगाव) यांना वितरीत करुन त्यांच्याकडून भारतीय चलनाच्या प्रतिलाख ६० हजाराच्या दराने कमिशन घेत घेतल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात या प्रकरणातील संशयित अशोक कुंभार याने बनावट नोटांच्या बदल्यात एकूण १६ लाख ८८ हजार रुपये आपल्याला दिल्याचे पश्चिम बंगाल मधून अटक केलेल्या संशयितांनी पोलीस तपासात सांगितले आहे. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, उपनिरीक्षक रमेश मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास किल्लेदार, दादू खोत, अरुण पाटील, युवराज पाटील, प्रशांत शेवाळे यांच्या पथकाने केली.


जिल्हा पोलीस प्रमुखांकडून गडहिंग्लज पोलिसांचे कौतुक

कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांचा नुकताच गडहिंग्लज  दौरा झाला होता. या दौऱ्यात त्यांनी गडहिंग्लज पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर या बनावट नोट प्रकरणाचा तपास उत्कृष्टरित्या केल्याबद्दल पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या टीमचे कौतुक केले होते. बनावट नोटांचा तपास गडहिंग्लज पोलिसांनी योग्य रीतीने युद्धपातळीवर करत या रॅकेटच्या मुळाशी पोचल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.