Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बदलीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम नोंद करण्यास सुरुवात

अर्ज ऑनलाईन पोर्टलवर सबमिट झाल्याची खातरजमा करावी


प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांचे आवाहन




कोल्हापूर :  ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णयानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची ऑनलाईन पध्दतीने बदली प्रक्रीया सुरु झाली आहे. बदली अधिकार पात्र (टप्पा क्रमांक 4) मधील पात्र शिक्षकांनी बदलीसाठी पर्याय निवडल्यानंतर निवडलेल्या पर्यायांची पडताळणी करुन आपला अर्ज अंतिम करुन ऑनलाईन पोर्टलवर सबमिट झाल्याची खातरजमा करावी तसेच अंतिम केलेल्या अर्जाची हार्डकॉपी जतन करुन ठेवावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी केले आहे.


सुधारित वेळापत्रकानुसार बदली अधिकार पात्र (टप्पा क्रमांक 4) मधील पात्र शिक्षकांना दिनांक 28 ते 31 जुलै 2025 या कालावधीत बदलीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम नोंद करण्यासाठीची सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे या संवर्गातील पात्र शिक्षकांना आवश्यक असलेली सुधारित रिक्त पदांची यादी दिनांक 27 जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगीनवरुन प्रसिध्द करण्यात आली असून ही यादी सर्व शिक्षकांना त्यांच्या स्वतःच्या लॉगीनवरून पाहता येणार आहे.


दिनांक 28 ते 31 जुलै  या कालावधीत आपल्या गटाकडील बदली अधिकार पात्र मधील सर्व पात्र शिक्षकांना त्यांच्या लॉगीनवरुन बदली करीता शाळांचा प्राधान्यक्रम काळजीपूर्वक निवडण्याबाबत सूचित करण्यात येत आहे. दिनांक 31 जुलै नंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही तसेच प्राधान्यक्रम निवडणे ही संबंधित शिक्षकांची जबाबदारी असल्यामुळे या प्रक्रीयेमध्ये कोणत्याही प्रकारची चुक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षकांची असेल, असेही डॉ. शेंडकर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.