शिवसेना उबाठाचे तहसीलदारांना निवेदन
आजरा (हसन तकीलदार ) : आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवर असलेल्या शेळप, दाभील, साळगाव आणि हाजगोळी या गावाना जोडणाऱ्या रस्त्यावर कोल्हापूर पद्धतीचे म्हणजेच के. टी बंधारे आहेत. याच बांधाऱ्यावरून या गावातील लोकांना वाहतूक करावी लागते. पावसाळ्यामध्ये या बांधाऱ्यांवर पाणी आलेस जीव धोक्यात घालून ये जा करावी लागते. त्यामुळे या बांधाऱ्यांना समांतर पूल बांधून नागरिकांची सोय करावी व याबाबत संबंधित विभागाला तात्काळ सूचना द्याव्यात याबाबत आजरा तहसीलदार समीर माने यांना शिवसेना उबाठा तर्फे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवर शेळप, दाभील, साळगाव आणि हाजगोळी या गावाना जोडणारे रस्ते कोल्हापूर पद्धतीने बांधलेल्या बंधाऱ्यावरून जातात. अंदाजे 1997 च्या आसपास यातील काही बंधारे बांधलेले आहेत. दरवर्षी या बंधऱ्यांना पुरामध्ये धोका निर्माण होतो. सद्या या बांधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. हिरण्यकेशीचा उगम आंबोली येथे झालेला असल्यामुळे आंबोली व आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात अतिपाऊस पडतो यामुळे दरवर्षी पूर येऊन हे बंधारे पाण्याखाली जातात यावर्षी देखील पुरामुळे या बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे ते बंधारे वाहतुकीसाठी अनेक दिवस बंद करण्यात आले होते. हे बंधारे अनेक गावाना जोडले असल्यामुळे यावरून एस. टी., ट्रॅक्टर,ऊस वाहतूक करणारी वाहने तसेच अवजड वाहने ये जा करीत असतात यामुळे ही बंधारे कमकुवत झालेली आहेत. तसेच बांधाऱ्यांवरील रस्त्यात खड्डे पडलेले आहेत. मुळातच या बांधाऱ्यांची वाहतूक क्षमता कमी असल्यामुळे अनेक वर्षापूर्वी बांधलेले हे बंधारे कमकुवत झालेले आहेत. त्याचप्रमाणे या बांधाऱ्यांना दोन्ही बाजूना संरक्षक कठडा नसल्यामुळे वाहतूक करणे धोकादायक ठरू शकते. भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी या बांधाऱ्यांना समांतर पूल होणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित विभागाला तात्काळ सूचना देऊन या ठिकाणी चारीही बांधाऱ्यांना समांतर पूल बांधण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
या अगोदरही हाजगोळी बंधाऱ्यावर भगदाड पडल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले होते. त्यावेळी तात्पुरती मुरमाची मलमपट्टी करण्यात आली होती. ही तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाय आखणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे.
या निवेदनावर संभाजी पाटील (उपजिल्हा प्रमुख), युवराज पोवार (तालुकाप्रमुख), ओंकार मद्याळकर (शहर प्रमुख), संजय येसादे (तालुका संघटक), अमित गुरव, सुयश पाटील, अनिल सुतार, विजय डोंगरे, संजय सावंत (देऊळवाडी), महादेव गुरव, सदानंद कदम आदींच्या सह्या आहेत.


