गडहिंग्लज (प्रतिनिधी): करंबळी (ता. गडहिंग्लज) येथे आषाढी एकादशी निमित्त येथील सावित्रीबाई फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा वारकरी दिंडी सोहळा उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला.
संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या अभंगांनी वातावरण भारावले होते. शाळेतील विद्यार्थी व गावातील वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने दिंडीमध्ये सहभागी झाला होता. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ, मृदंग, अभंग आणि भगव्या पताका घेऊन मार्गक्रमण केले. काहींनी पालखीची सेवा भावपूर्वक केली. मारुती जाधव, एम.डी पाटील, संतराम दोरुगडे, मारुती वाईंगडे, कृष्णा यादव, दिनकर सुतार, प्रभू मोरे, आप्पा देसाई, प्रतीक सुतार आदी वारकऱ्यांसोबत ग्रामस्थ दिंडीमध्ये सहभागी झाले होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विजयराव माळी यांनी विद्यार्थ्यांना व वारकऱ्यांना अल्पोपहार दिला.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी. आर. माळी, एन. आर. शेडेकर व सर्व संचालक उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जयसिंग कांबळे, प्रभावती मुगळी, सचिन पन्हाळकर, पूजा एकल, विद्या पुजारी, संजयकुमार माळी, बाळासो चौगुले, नारायण माळी, तुकाराम मिसाळ यांनी परिश्रम घेतले.





