४ लाखांचा मुद्देमाल जप्त; कारवाईने तालुक्यात खळबळ
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरात मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारत ४ महिलांसह १२ जणावर कारवाई केली आहे. तर ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गडहिंग्लज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण गडहिंग्लज तालुक्यात खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गडहिंग्लज पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे.
याबाबतची पोलिसातून मिळालेल्या अधिक माहिती अशी की, शहरातील साई गार्डनजवळील एका जुन्या घराच्या पहिल्या मजल्यावर मटका अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत ८ जणांना रंगेहाथ पकडले. यामध्ये ४ महिलांचाही समावेश आहे. मटका अड्ड्याच्या ठिकाणाहून सुमारे ४ लाख रुपयांचा जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आले आहे. मोबाईल फोन, मटका चिठ्ठ्या, कॅल्क्युलेटर, दुचाकी व इतर साहित्य देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तालुक्यात मटका, जुगार यासारख्या अवैध व्यवसायावर पोलिसांनी आक्रमक पावले उचलली आहेत. या कारवाईमुळे जुगारांवर नियंत्रण बसेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तींवर जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. गडहिंग्लज परिसरात अशा प्रकारचे अड्डे पुन्हा उभे राहू नयेत, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक लोकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. पुढील काही दिवसांत अशा कारवाया वाढवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

