आजरा (हसन तकीलदार) : पेरणोली (ता. आजरा) येथील मच्छिन्द्र नारायण कालेकर यांचे आकस्मिक निधन झाले. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची व नाजूक असणाऱ्या कालेकर कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले. त्यामुळे कालेकर कुटुंबियांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली या संदर्भात माहिती घेऊन श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कालेकर कुटुंबियांचे सांत्वन करत पंधरा हजारांची आर्थिक मदत दिली.
श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीचे ब्रँड ऍम्बेसिडर माजी राजदूत व विदेश मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या चांगुलपणाची चळवळ या उपक्रमांतर्गत रवळनाथतर्फे ही मदत देण्यात आली. मच्छिन्द्र कालेकर हे भूमिहीन शेतमजूर असल्यामुळे गावी शेतमजूरी आणि पशुपालन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. झोपडीवजा घरात राहणारी त्यांची आई, पत्नी, मुलगा असा त्यांचा परिवार आहे. गेल्या दोन महिन्यापासून ते आजारी होते. त्यांच्या उपचारासाठी घरातील पशुधनाचीदेखील कुटुंबियांना विक्री करावी लागली. त्यामुळे कालेकर कुटुंबीय सर्वबाजूनी आर्थिक संकटात सापडले आहे. 'रवळनाथ' तर्फे नेहमीच समाजातील अपघातग्रस्त, जळीतग्रस्त, गरीब आणि संकटात सापडलेल्या दुर्बल घटकासाठी सहकार्य केले जाते. अशा प्रसंगी माणुसकीच्या नात्याने हतबल होणाऱ्या बांधवांना धीर देण्याचे आणि मायेची उब देण्याचे काम नेहमीच 'रवळनाथ'कडून केले जाते. या मदतीबद्दल कालेकर कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी रवळनाथ हौसिंग सोसायटीचे आभार मानले आहेत.
रवळनाथचे संचालक प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांनी देखील वैयक्तिक अकरा हजारांची आर्थिक मदत दिली. याप्रसंगी संचालक प्रा. व्ही. के. मायदेव, सीईओ डी. के. मायदेव, सरपंच सौ. प्रियांका जाधव, कारखाना संचालक उदयराज पवार, वसंत तारळेकर, टी. एस. गडकरी, ग्रामपंचायत सदस्या सुनीता कालेकर, पत्रकार रणजित कालेकर, कालेकर कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.


