कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी याबाबत सर्वांचे लक्ष वेधल्याने समाजातून प्रतिसाद
हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशन, आरदाळकर ग्रुप, 'शंभर रुपयात समाजसेवा', 'विघ्नहर्ता सोशल फाउंडेशन' यांचा मदतीचा हात
आजरा (हसन तकीलदार) : आरदाळ (ता. आजरा) येथील 80 वर्षाचे गंगाराम कांबळे यांच्या घराचे छप्पर पावसाने कोसळले. ओल्या, धोकादायक घरात ते राहत होते. याबाबत कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी सर्वांचे लक्ष वेधत त्यांना मदतीची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने विविध सामाजिक संघटना व नागरिकांतून मदतीचा ओघ सुरू झाला. गंगाराम कांबळे यांची ही व्यथा कॉम्रेड गुरव यांच्या माध्यमातून 'गडहिंग्लज बुलेटीन' ने (GB NEWS) सविस्तर प्रसिद्ध करून याकडे शासनाचे देखील लक्ष वेधले होते. त्या पार्श्वभूमीवर. श्री. कांबळे यांच्या राहण्याची सोय ग्रामसेवक, तलाठी व सरपंच यांनी समाज मंदिरात केली आहे. त्यामुळे तात्पुरता निवारा गंगाराम यांना मिळाला आहे. त्या पाठोपाठ नागरिकांतून मदतीचा ओघ देखील सुरु आहे. त्याबद्दल कॉ. शिवाजी गुरव यांनी सर्व प्रसिद्धी माध्यमांचे आभार मानले आहेत.
कोणाचाही आधार नसलेले गंगाराम कांबळे यांना डोक्यावर छप्परही नाही. आणि जीव मुठीत घेऊन जगत असल्याबाबतची माहिती कॉ. शिवाजी गुरव यांनी आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीला दिली होती. त्यानुसार याबाबत बातमी प्रसिद्ध करून लक्ष वेधण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने दखल घेत समाज मंदिरात तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे. अवघ्या आठ ते दहा दिवसात मदतीचा ओघ सुरू झाला. तहसीलदार यांच्यासह सर्वांनी त्यांची काळजी घेतली.
उत्तुर येथील हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशन यांनी छताची जबाबदारी घेतली. जमिनीवर भर टाकून ऒल कमी करण्यासाठी भर टाकण्याची जबाबदारी आरदाळकर ग्रुपने घेतली तर 'शंभर रुपयात समाजसेवा' या उत्तूर परिसरातील ग्रुपने फरशी बसवण्याची जबाबदारी घेतली आहे.
गंगाराम आजोबांच्या वयाचा विचार करून 'विघ्नहर्ता सोशल फाउंडेशन' यांनी त्यांना चटई, ब्लॅंकेट, स्वेटर यासह काही वस्तू भेट दिल्या आहेत. माणुसकी अजूनही जिवंत आहे या भावनेतून मदत देणाऱ्यांची गंगाराम कांबळे यांनी भाऊक होत हात जोडून आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव व अमोल बांबरे यांनी देखील मीडियाचे आभार मानले.



