शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त उपक्रम
तालुका प्रमुख अजित खोत यांचे मार्गदर्शन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शिवसेना शाखा वडरगे आणि प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे आयोजन सौ. सुजाता पांडुरंग खोत यांनी केले होते. पावसात विद्यार्जनासाठी येणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
कार्यक्रमप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख अजित खोत यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक विचारांचे वारसदार म्हणून असे लोकाभिमुख व विद्यार्थ्यांच्या उपयोगाचे उपक्रम राबवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास वडरगे शाखाप्रमुख संभाजी हजारे, उपशाखाप्रमुख रमेश जावळे, चव्हाटा सेवा संस्था संचालक मारुती आडावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ गोरुले, सदस्या अंबिका आडावकर, वैशाली जावळे, भाऊसाहेब माळावी, महेश मोरे, भैरू जावळे, आणि सुरेश पोटे तसेच साई तरुण मंडळाचे अध्यक्ष किरण माने, उपाध्यक्ष संतोष आडावकर, सचिव अंकुश चौगुले, रोहित गोरुले, महेंद्र पोवार, चेतन चौगुले, विशाल देवार्डे, सुरज गोरुले, कमलेश गोरुले, सुनील सुतार, राहुल पाटील यांसह शाळेचा संपूर्ण शिक्षक वर्ग, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐन पावसाच्या दिवसांत सुजाता खोत यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थ आणि पालकवर्गातून विशेष कौतुक होत आहे.


