गडहिंग्लज (संपत सावंत ): रक्षाबंधनाचा पवित्र सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता निसर्गाशी असलेले मानवाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी जागृती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक आदर्श वस्तूपाठ घालून दिला आहे. प्लॅस्टिक व रासायनिक घटकांना पूर्णपणे फाटा देत, विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या सेंद्रिय राख्या वृक्षांच्या मनगटावर बांधून ‘वृक्ष संवर्धन’ हेच खरे जीवनरक्षण असल्याचा संदेश दिला.
विद्या प्रसारक मंडळ, गडहिंग्लज संचलित जागृती हायस्कूलमध्ये हा पर्यावरणपूरक रक्षाबंधन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी झाडांची पाने, ताजी फुले, बिया आणि नैसर्गिक साहित्याचा वापर करून अत्यंत आकर्षक व सेंद्रिय राख्या तयार केल्या होत्या. शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसरातील विविध वृक्ष आणि वेलींना या राख्या बांधल्या व त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. कार्यक्रमादरम्यान कु. सिद्धी देसाई हिने उपस्थित सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना पर्यावरण रक्षणाची सामुदायिक प्रतिज्ञा दिली.
या अभिनव उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, उपाध्यक्ष अरविंद कित्तुरकर, सचिव ॲड. बाबुराव भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी व सर्व संचालक मंडळाचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक उमेश सावंत, उपमुख्याध्यापक अनिल मसाळे, पर्यवेक्षक महंतेश दड्डी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी वृक्षांना राखी बांधून निसर्ग संवर्धनाचा दृढ संकल्प केला.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. स्मिता शिंदे, सौ. कल्पना शिंदे आणि सौ. गीता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला विद्यार्थ्यांचा व कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.


