कोल्हापूर राज्य अधिवेशनाचा फुंकला शंखनाद ; आजऱ्यात किसान सभेचा 'संघर्ष व लढा मेळावा' संपन्न
अखिल भारतीय किसान सभेच्या २४ व्या राज्य अधिवेशनाची आजऱ्यातून जोरदार तयारी
देवस्थान-मठ ट्रस्ट जमिनी, कर्जमुक्ती व शेतीमालाच्या हमीभावाबाबत मेळाव्यात ६ महत्त्वाचे ठराव मंजूर
आजरा (प्रतिनिधी): अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने कोल्हापूर येथे होणाऱ्या २४ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आजरा येथे 'संघर्ष व लढा मेळावा' उत्साहात पार पडला. देवस्थान व मठ ट्रस्ट जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क मिळेपर्यंत, तसेच शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी निकराचा लढा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.
जिजामाता कॉलनीतील श्रमिक पतसंस्थेत पार पडलेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कायदेतज्ज्ञ व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲड. दशरथ दळवी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी किसान सभेच्या प्रदीर्घ संघर्षाचा आढावा घेत, देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांनी कायदेशीर व संघटनात्मक लढ्यासाठी एकजूट राहण्याचे आवाहन केले.
अधिवेशनासाठी शेतकरी-कष्टकऱ्यांनी कोल्हापूरला चलावे: संग्राम सावंत
किसान सभेचे समन्वयक व जिल्हा सहसचिव संग्राम सावंत म्हणाले, आजरा तालुका व कोल्हापूर जिल्ह्यातील देवस्थान आणि मठ ट्रस्ट जमिनी कसणाऱ्यांच्या हक्कासाठी संघटना ठाम उभी आहे. गावठाणवाढ, बेघर आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर पुढील लढ्याची ठोस दिशा ठरवली जाईल. येत्या ६, ७ व ८ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर शहरात होणाऱ्या राज्य अधिवेशनाला आजरा तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते कॉ. संजय घाटगे, किसान सभेचे तालुका नेते कॉ. शिवाजी गुरव, तसेच भाकप (माले) व गिरणी कामगार संघटनेचे कॉ. शांताराम पाटील यांनीही शेतमजूर व कामगारांचे प्रश्न शेतकरी चळवळीशी जोडून संयुक्त लढा उभारण्याबाबत मार्गदर्शन केले.
मेळाव्यात मंजूर करण्यात आलेले ६ महत्त्वाचे ठराव
देवस्थान व मठ ट्रस्ट जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचे हक्क सुरक्षित करून अन्यायकारक बेदखली थांबवणे, उत्पादन खर्चावर आधारित योग्य व रास्त नफा देणारा हमीभाव लागू करणे, शेतकरी कर्जमुक्ती आणि पीक विम्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, तात्काळ नुकसानभरपाई: सिंचन, वीज, पाणी वाटप आणि नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईचे प्रश्न त्वरित सोडवणे, शेतमजूर व भूमिहीनांसाठी गावठाणवाढ करणे आणि रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवणे, कोल्हापुरातील ६ ते ८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान होणाऱ्या २४ व्या राज्य अधिवेशनाच्या प्रचारासाठी तालुक्यात व्यापक मोहीम राबवणे.
या मेळाव्यास सुरेश शिंगटे, ज्योतीराम राणे, श्रावण चौगुले, वंचित युवाचे नेते दत्तात्रय कांबळे, संतोष मासोळे, तसेच किसान सभेचे संभाजी मोहिते, शिवाजी गिलबिले, भगवान सूर्यवंशी, राजेंद्र देशमुख, रामा कांबळे, संतोष माने, सचिन लोहार, शुभम कांबळे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



