Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

घरापासून दूर असणाऱ्या लहानग्यांच्या मनगटावर सजली 'राखी'!

तारळे वसतिगृहात ठाकरे शिवसेना महिला आघाडीचे अनोखे रक्षाबंधन




राधानगरी: घरापासून दूर, शिक्षणासाठी वस्तीगृहात राहणाऱ्या लहानग्यांच्या चेहऱ्यावर आई-बहिणीच्या मायेची ऊब आणि आनंदाचे हसू फुलवणारा एक अत्यंत भावुक उपक्रम राधानगरीत पार पडला. सण-उत्सवाच्या काळात घरची आठवण येणाऱ्या या चिमुकल्यांचा विसर पडू न देता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पु.शी. तथा काका आठवले विद्यार्थी वसतिगृह (क. तारळे, ता. राधानगरी) येथे मुलांसोबत रक्षाबंधनाचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि हृदयस्पर्शी वातावरणात साजरा करण्यात आला.



सणासुदीच्या दिवशी आपल्या कुटुंबापासून दूर असणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या मनगटावर जेव्हा भगिनींनी प्रेमाची राखी बांधली, तेव्हा संपूर्ण वस्तीगृहाचा परिसर एका कौटुंबिक आणि आपुलकीच्या नात्याने उजळून निघाला होता.



मायेचा स्पर्श आणि आपुलकीचा संवाद


कार्यक्रमादरम्यान महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वस्तीगृहातील प्रत्येक विद्यार्थ्याला राखी बांधून त्यांचे औक्षण केले आणि त्यांना गोडधोड भरवून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. रक्षाबंधनाचा हा पवित्र धागा केवळ एक सण न राहता, या मुलांच्या पाठीशी एक भक्कम आधार उभा असल्याचा विश्वास देणारा ठरला. राखी बांधून झाल्यानंतर मुलांच्या डोळ्यात फुललेला आनंद आणि समाधान पाहून उपस्थित सर्वांना या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवता आल्याचे समाधान मिळाले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मुलांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अभ्यासाची व राहण्याची चौकशी केली. समाजातील घटकांना एकत्र आणून सण साजरा करण्यात खरी सार्थकता असते, हीच भावना या उपक्रमातून दिसून आली.



यावेळी महिला जिल्हा संघटक विमल पाटील, विधानसभा समन्वयक जयश्री पोवार, तालुका संघटक कल्पना भोसले, उप तालुका संघटक दिपाली कानकेकर याशिवाय वस्तीगृहातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या सोहळ्याला उपस्थित होते. वस्तीगृह प्रशासनाच्या वतीने या उपक्रमाबद्दल शिवसेना महिला आघाडीचे आभार मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.