गावातील सर्पमित्रांचा गौरव; शिक्षण, आरोग्यासाठी कटिबद्ध राहण्याचा प्रतिष्ठानचा संकल्प
कोवाडे (वार्ताहर) : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यातील गुणवत्तेला योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशाने आजरा तालुक्यातील कोवाडे येथे स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
या सोहळ्यात इयत्ता पहिली ते सातवीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवलेल्या विजेत्यांनाही गौरविण्यात आले. गावातील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सर्पमित्रांचा विशेष सन्मान
केवळ शैक्षणिक उपक्रमापुरते मर्यादित न राहता, गावात सामाजिक बांधिलकी जपत स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या सर्पमित्रांचाही या कार्यक्रमात स्वामी प्रतिष्ठानतर्फे विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उस्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमात एक आगळावेगळा उत्साह पाहाव्यास मिळाला.
सेवेतून समाधान… सहकार्यातून समाजविकास!
स्वामी प्रतिष्ठान, कोवाडे यांनी केवळ शैक्षणिक उपक्रम न राबवता समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकासाची वाटचाल सुरू ठेवली आहे. “सेवेतून समाधान… सहकार्यातून समाजविकास!” या ब्रीदवाक्याला धरूनच प्रतिष्ठानची भविष्यातील सामाजिक वाटचाल सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी स्वामी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य, स्थानिक शिक्षक, पालक व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्व घटकांचे प्रतिष्ठानच्या वतीने शेवटी आभार मानण्यात आले.
गरजूंना मदत करण्याचा आमचा मानस
खूप दिवसांपासून नियोजन केलेला हा उपक्रम यशस्वी झाला. गावातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आणि गरजूंपर्यंत पोहोचता आल्याचे मोठे समाधान आहे. भविष्यातही शिक्षण, आरोग्य व इतर क्षेत्रांत सामाजिक उपक्रम राबवून गरजूंना मदत करण्याचा आमचा मानस आहे.
पदाधिकारी, स्वामी प्रतिष्ठान (कोवाडे)


