विद्यार्थ्यांना लाभले रुग्णालय व्यवस्थापन आणि औषधनिर्माण शास्त्राचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक ज्ञान
कोल्हापूर: येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित, न्यू कॉलेज ऑफ फार्मसी (उचगाव, कोल्हापूर) येथील डी.फार्मसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अभ्यासदौरा नुकताच सिद्धगिरी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर (कणेरी) आणि दत्तकला मेडिकल (मणेरमळा) येथे उत्साहात पार पडला. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना रुग्णालयातील प्रत्यक्ष कामकाज आणि औषधनिर्माण क्षेत्रातील व्यावहारिक पद्धतींची उजळणी व्हावी, या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
डी.फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये 'औषधनिर्माण अधिकारी' (फार्मासिस्ट) म्हणून सेवा बजावतात. भविष्यात प्रत्यक्ष कामावर रुजू झाल्यावर येणाऱ्या अडचणींवर मात करता यावी आणि विविध विभागांतील कामाचे स्वरूप समजून घेता यावे, यासाठी या अभ्यासभेटीचे विशेष आयोजन करण्यात आले होते.
सिद्धगिरी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका चौगुले आणि रंगराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना रुग्णालयीन सेवा, विविध विभाग आणि रुग्ण व्यवस्थापनाची सविस्तर माहिती दिली.
दत्तकला मेडिकल, मणेरमळा येथील सुशांत यादव यांनी विद्यार्थ्यांना हॉस्पिटल फार्मसी प्रॅक्टिस, पेशंट केअर सिस्टीम, क्लिनिकल मॅनेजमेंट, मेडिकल सर्व्हिसेस आणि फार्मसी ऑपरेशन्स यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा अभ्यासदौरा यशस्वी करण्यासाठी प्रा. रितुराज देसाई, प्रा. वैशाली यादव, प्रा. काजल मोहिते, प्रा. साक्षी माने, प्रा. अंजली महाडिक आणि प्रा. धनश्री रावल यांनी विशेष परिश्रम घेतले.


