गडहिंग्लज आणि परिसरातील आर्किटेक्ट्स व इंजिनिअर्सना मिळाले ऑनलाईन बांधकाम मंजुरीचे प्रशिक्षण
पारदर्शक आणि गतिमान प्रशासनासाठी उपक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शासनाच्या गतिमान आणि पारदर्शक धोरणानुसार नगररचना व बांधकाम परवानग्यांच्या प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य झाला आहे. या पार्श्वभूमीवर, काल (गुरुवार, दि. २० ऑगस्ट) भडगाव येथील ए. डी. शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 'बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टिम' (BPMS) या सॉफ्टवेअरवर आधारित विशेष तांत्रिक सेमिनारचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
आर्किटेक्ट्स अँड इंजिनीअर्स असोसिएशन गडहिंग्लज, क्रेडाई गडहिंग्लज आणि ए. डी. शिंदे इंजिनीअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले होते.
सध्या नगरपालिका, महानगरपालिका, विविध प्राधिकरणे आणि टाऊन प्लॅनिंग कार्यालयांकडून बांधकाम परवाना तसेच प्लॉटिंग ले-आऊट मंजुरीसाठी ऑनलाईन अर्ज, नकाशे आणि आवश्यक कागदपत्रे दाखल करणे बंधनकारक आहे. हे सर्व कामकाज 'बीपीएमएस' (BPMS) या सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे चालते. या प्रणालीचा अचूक व गतीने वापर कसा करावा, याबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर सेमिनारमध्ये जावेद काझी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट मॅनेजर सचिन देवरे आणि अजय कुलकर्णी यांनी उपस्थितांना सॉफ्टवेअरचे सखोल प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घेवडे होते. तर गडहिंग्लज नगरपालिकेचे अभियंता विशाल बेंडखळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन असोसिएशनचे अध्यक्ष इंजि. राजेंद्रकुमार पाटील, क्रेडाई गडहिंग्लजचे अध्यक्ष आर्किटेक्ट विरुपाक्ष पाटणे, ए. डी. शिंदे कॉलेजचे प्रा. मदकरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. उपस्थितांचे आभार इंजि. अजित उत्तूरकर यांनी मानले. या कार्यशाळेला गडहिंग्लज परिसरातील मोठ्या संख्येने इंजिनिअर्स, आर्किटेक्ट्स व विद्यार्थी उपस्थित होते.






